Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

मतदार यादी कामात हलगर्जीपणा केल्यामुळे शिक्षकाचे निलंबन

 



मनोज एल खोब्रागडे

    मुख्य संपादक 

8208166961/9860020016


चंद्रपूर, दि.  20 : मतदारयादीची तयारी, पुनरावलोकन व दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याप्रकरणी सरस्वती विद्या मंदिर, नकोडा येथील सहायक शिक्षक आदर्श उत्तम दुधगवळी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


मतदारयादीत नियमानुसार नोंदी समाविष्ट करणे अथवा वगळणे या संदर्भातील अधिकृत कर्तव्य पार पाडण्यात त्यांनी हयगय, टाळाटाळ व निष्काळजीपणा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमान पंत यांनी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 चे कलम 13 (AA) तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील तरतुदींनुसार अधिकारांचा वापर करून श्री. दुधगवळी यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.


निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय निश्चित करण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, चंद्रपूर यांना देण्यात आले असून पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.


तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तन) नियम, 1979 च्या नियम 16 नुसार निलंबन कालावधीत कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध पुढील शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून निर्वाह भत्त्यावरील हक्कही बाधित होऊ शकतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments