Type Here to Get Search Results !

दडून बसलेल्या बिबट्याची झडप ,




पत्नीसमोरच पतीचा गेला जीव , भंडारा जिल्हयातील भयंकर घटना !


✍️भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.93734`2847


भंडारा  : भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात पत्नीसोबत शेतशिवारात गवत आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दडून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. यात शेतकरी जागीच ठार झाला. बाबुराव नत्थुजी पिल्लेवान ( वय ५० वर्षे, रा.कोदुर्ली ता. पवनी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पत्नीसमोरच घडलेली ही थरारक घटना शुक्रवार २२ मे रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास पिलांद्री शेतशिवारात घडली.


माहितीनुसार, बाबुराव व त्यांची पत्नी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेले होते. सोबत जेवणाचा डबाही घेऊन गेले होते. जेवण झाल्यावर काम आटोपत असतानाच दडून बसलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर अचानक हल्ला केला. हल्ला केल्यानंतर बिबट्याने चवताळलेल्या नजरेने महिलेकडे बघितले. क्षणाचाही विचार न करता महिलेने गावाकडे पळ काढत घटनेची माहिती दिली. ग्रामस्थ तथा वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बुध्दरत्न पिल्लेवान (२७) यांच्या तक्रारीवरून घटनेची नोंद करण्यात आली आहे. वाघ, बिबट, अस्वल यांचे हल्ले वाढले असून परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ धास्तावले आहेत.


*वनविभागाकडून ट्रॅप कॅमेरे व पिंजरे लाऊन! शार्पसुटरांचे केले पाचारण*

परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ या घटनेमुळे धास्तावले असून अडयाळ वनविभाग व जिल्हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वनविभागाने तात्काळ उपाययोजना म्हणून घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे बसवण्यास व पिंजरे लावण्यास सुरूवात केली आहे. तसेच भंडारा येथून शार्पशूटर पाचारण करण्यात आले आहे.

*वनविभागाची २५ लाखांची मदत घोषित*

मृत पावलेल्या बाबुराव पिल्लेवान यांच्या कुटुंबियाला वनविभागाने २५ लाखांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान सायंकाळी ६ वाजता शविवच्छेदन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

*व्हिसेरा पाठविणार प्रयोगशाळेत*

प्रथामिक अंदाजानुसार बिबट्याचा हल्ल्यात बाबुराव पिल्लेवान यांचा मृत्यू झाला. मात्र हल्ला करणारा हिंस्त्र प्राणी नेमका बिबट होता की वाघ याबाबत स्पष्टता वनविभागाने केलेली नाही. परिणामी मृत पिल्लेवान यांचा व्हिसेरा काढण्यात आला असून तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. मृतदेहावरील जखमांचे व्रण वाघाचे की बिबट्याचे ही बाब अहवालात स्पष्ट झाल्यावरच नेमका हिंस्त्र प्राणी कोणता हे कळेल.

Post a Comment

0 Comments