नागरिकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची “व्हॉट्सअॅप चॅटबॉट” सेवा सुरु
मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
परभणी, दि. 22 : - महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांसाठी “व्हॉट्सअॅप चॅटबॉट” सेवा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या व्हॉट्सअॅ्प चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजना, सेवा व उपक्रमांची माहिती घरबसल्या सहज उपलब्ध होणार आहे. तसेच नागरिकांना तक्रार नोंदविण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आलेली असून प्राप्त तक्रारी संबंधित विभागांकडे त्वरित पाठवून त्यांचे जलद निराकरण करण्यास मदत होणार आहे.
या व्हॉट्सअॅ प चॅटबॉटचा क्रमांक ९८२३०६५९७३ असा असून नागरिकांनी या क्रमांकावर “Hi”असा संदेश पाठवून उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा किंवा https://parbhani.gov.in/ या संकेतस्थळास भेट देऊन उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करूनसुद्धा सदर सेवांचा लाभ मराठी व इंग्रजी भाषेमध्येस घेता येईल.
सदर चॅटबॉटमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांची माहिती, आर.टी.एस. सेवा, माझे आधार, सातबारा, अॅग्रीस्टॅक, भूमी व महसूल सेवा, जनगणना २०२७ यांसंदर्भातील माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ व विधवा निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आदी योजनांची माहिती, पात्रता व आवश्यक कागदपत्रांविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
मतदार यादीमध्ये नवीन नाव नोंदणी, दुरुस्ती प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच निवडणुकीतील गैरप्रकारांबाबत तक्रार नोंदविण्याबाबतची माहिती चॅटबॉटमध्ये उपलब्ध आहे.
पुरवठा शाखेअंतर्गत अन्नधान्य योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नगर पालिका प्रशासन विभागामार्फत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या ६४ लोकसेवांची माहिती, आवश्यक कागदपत्रे, लागू शुल्क व नियत कालमर्यादा याबाबत माहिती उपलब्ध आहे.
महसूल शाखेअंतर्गत वर्ग २ जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्यासाठी तसेच आदिवासी जमीन विक्री परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी उपलब्ध आहे. अभिलेख शाखेमार्फत जुने सातबारे, फेरफार, हस्तलिखित नकला आदी कागदपत्रे प्राप्त करण्यासंदर्भातील माहिती उपलब्ध आहे.
भूसंपादन विभागामार्फत भूसंपादन प्रक्रियेविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली असून पुनर्वसन विभागांतर्गत प्रकल्पग्रस्त व्यक्तींना आवश्यक प्रमाणपत्रे, पुरावे व कागदपत्रांविषयी माहिती उपलब्ध आहे.
आस्थापना शाखेमार्फत स्थायी व अस्थायी मंजूर पदे तसेच रिक्त पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतिबंध निश्चित करण्यासाठी मार्च २०२६ अखेरची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
VB-GRAMG अंतर्गत जनजागृतीसाठी विकसित करण्यात येत असलेल्या पोर्टलबाबतची माहिती देखील उपलब्ध आहे.
गृह शाखेअंतर्गत नवीन पेट्रोलपंप / गॅसपंप प्रस्तावासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी उपलब्ध आहे. सामान्य शाखेमार्फत सिलिंग जमीन, आदिवासी शेतजमीन, मदतमाश इनाम जमीन यासंदर्भातील माहिती व आवश्यक कागदपत्रांची माहिती उपलब्ध आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत अर्थसहाय्य मिळू शकणाऱ्या आजारांची यादी, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया तसेच इतर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
तसेच महसूल अधिकाऱ्यांची हस्तपुस्तिका व परभणी जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारसाचे ई-बुक नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
सदर व्हॉट्सअॅरप चॅटबॉट विकसित करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी तसेच राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांचे सहकार्य लाभले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी या डिजिटल सुविधेचा अधिकाधिक वापर करून शासनाच्या योजना व सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments