Type Here to Get Search Results !

ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, झरी येथे पहिली पालक सभा उत्साहात संपन्न




अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी 


आज दिनांक २५ जून २०२६ रोजी ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, झरी येथे शैक्षणिक वर्षातील पहिली पालक सभा सकाळी १०.३० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेस संस्थेचे संचालक फा. निलम लोपीस, तलासरी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष श्री. सुरेश भोये, सकाळ वृत्तसेवा प्रतिनिधी श्री. देवार्शिष वैद्य तसेच शाळेच्या प्राचार्या सि. बस्तियान फर्नांडिस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शिक्षिका सौ. हेमलता तांडेल यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रस्तावना करून केली. त्यानंतर ‘खरो तो एकची धर्म’ या प्रार्थना गीताने सभेला प्रारंभ झाला.

सभेदरम्यान तलासरी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व दानशूर पालक श्री. सुरेश भोये यांना नुकतीच एलएलबी पदवी प्राप्त झाल्याबद्दल शाळेच्यावतीने संचालक फा. निलम लोपीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना श्री. भोये यांनी ज्ञानमाता झरी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीचे कौतुक करत शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय यशामुळे शाळेची ख्याती सर्वदूर पोहोचल्याचे सांगितले.

विद्यार्थिनी कु. रिपिका बीज व कु. अपर्णा सपकाळ यांनी शाळेत उपलब्ध करून दिलेल्या विविध सोयी-सुविधांबद्दल संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली तसेच फा. निलम लोपीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे संचालक फा. निलम लोपीस यांनी पालकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करावे व संस्थेमार्फत दर्जेदार शिक्षणासोबत आदर्श नागरिक घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

सकाळ वृत्तसेवा प्रतिनिधी श्री. देवार्शिष वैद्य यांनी ‘NIE – न्यूज पेपर इन एज्युकेशन’ उपक्रमाविषयी माहिती देत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, इंग्रजी, शिष्यवृत्ती, विज्ञान आणि सामान्य ज्ञान यांसारख्या विषयांवरील विशेष माहिती उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.

शिक्षक श्री. प्रसाद थापड यांनी शाळेची शिस्त हेच यशाचे प्रमुख कारण असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांनी पूर्ण गणवेशात शाळेत यावे तसेच मोबाईल व मोटारसायकल शाळेत आणण्यास बंदी असल्याचे सांगितले. घरातही मुलांना मोबाईल व दूरदर्शनपासून योग्य अंतर ठेवण्याचे आवाहन त्यांनी पालकांना केले.

विद्यार्थी सुरक्षा विषयावर श्री. हेमंत अधिकारी यांनी पालकांना मार्गदर्शन केले. तर श्री. दिलीप राबड यांनी आदिवासी विभागामार्फत होणाऱ्या क्रीडा स्पर्धा, बोर्ड परीक्षेतील अतिरिक्त गुण व विविध प्रशासकीय भरती प्रक्रियेमधील लाभ याविषयी माहिती दिली.

प्राचार्या सि. बस्तियान फर्नांडिस यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात पालकांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन करत डिजिटल शिक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि पालकांचा विश्वास यामुळे शाळेने प्रगती साधल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांसमोरील शैक्षणिक आव्हानांवर मात करत उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्यांनी उपस्थित पालकांचे आभार मानून सभेची सांगता केली.

Post a Comment

0 Comments