"अंत्यसंस्कारासाठीही पाण्याची वणवण; संतप्त नागरिकांचा नगरपंचायतीला उग्र आंदोलनाचा इशारा..!"
तीर्थक्षेत्र माहूरची लाजिरवाणी अवस्था; कोट्यवधींचा निधी कुठे जातो..? नागरिकांचा थेट सवाल...!!
माहूर प्रतिनिधी
आदित्य खंदारे
देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माहूर शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, नगराध्यक्षांच्या स्वतःच्या वार्डातील दलित वस्ती मागील तब्बल तीन महिन्यांपासून पाण्याच्या एका थेंबासाठी अक्षरशः वणवण भटकत असल्याचा संतापजनक आरोप नागरिकांनी केला आहे. या गंभीर प्रकारामुळे संतप्त महिला, युवक आणि नागरिकांनी नगरपंचायत प्रशासन, तहसील कार्यालय आणि लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार, वार्ड क्रमांक ३ व ७ मधील दलित वस्तीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र संबंधित पाईपलाईनमध्ये अनधिकृत हस्तक्षेप करून पाणी इतरत्र वळविण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. परिणामी शेकडो नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे ही परिस्थिती सर्वसामान्य भागात नसून थेट नगराध्यक्षांच्या वार्डात निर्माण झाली असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. "ज्यांच्या वार्डातील नागरिक तहानलेले आहेत, ते संपूर्ण शहराचा कारभार कसा सांभाळणार?" असा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे.
★ अंत्यसंस्कारासाठीही पाणी मिळाले नाही; प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह..!
नागरिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका गरीब दलित कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले. मात्र अंत्यसंस्कारासाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्यामुळे नातेवाईकांना गावभर धावपळ करावी लागली. मृत व्यक्तीच्या अंतिम विधीसाठीसुद्धा पाणी मिळू नये, यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती असू शकते, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
तीर्थक्षेत्रात आठ-दहा दिवसांनी पाणी; तेही गढूळ आणि दूषित!
एकीकडे दलित वस्ती तीन महिन्यांपासून कोरडी पडली असताना दुसरीकडे संपूर्ण माहूर शहरालाही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आठ ते दहा दिवसांतून एकदाच आणि तेही अवघ्या अर्ध्या तासासाठी पाणीपुरवठा केला जातो.
धक्कादायक बाब म्हणजे अनेक ठिकाणी नागरिकांना गढूळ, मातीमिश्रित आणि अशुद्ध पाणी मिळत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. परिणामी पोटाचे विकार, त्वचारोग आणि इतर साथीच्या आजारांचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
★ पाणीपट्टी नियमित; सेवा मात्र शून्य..!
नागरिकांकडून दरमहा पाणीपट्टी वसूल केली जात असताना मूलभूत सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. "पाणी नाही, सुविधा नाहीत; मग नागरिकांनी कर आणि पाणीपट्टी कशासाठी भरायची?" असा सवाल महिलांनी प्रशासनाला केला.
कोट्यवधींचा विकास निधी कुठे खर्च होतो?
माहूर हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे दरवर्षी विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होतो. तसेच यात्रा काळात लाखो भाविक येथे येतात. मात्र आजही शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि मूलभूत सुविधा मिळत नसल्याने विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पैनगंगा नदीवरील धनोडा येथील कोल्हापुरी बंधाऱ्यात पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना थेंब-थेंब पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
★ "ग्रामपंचायतच बरी होती" — नागरिकांचा संताप
नगरपंचायतीच्या कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया देताना अनेक नागरिकांनी, "या नगरपंचायतीपेक्षा आमची जुनी ग्रामपंचायतच बरी होती. किमान पिण्याच्या पाण्यासाठी तरी एवढी फरफट करावी लागत नव्हती," अशी खंत व्यक्त केली.
★ "महिलांचा एल्गार : "पाणी द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू..!"
संतप्त महिलांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, दलित वस्तीचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्यात यावा, पाणीपुरवठा विस्कळीत करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी आणि संपूर्ण शहराला नियमित व शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा. अन्यथा नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून तीव्र लोकआंदोलन छेडतील आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील..
"विशेष म्हणजे माहूरसारख्या जागतिक स्तरावर ओळख असलेल्या तीर्थक्षेत्रात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणे ही केवळ प्रशासनाची अपयशकथा नसून लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवरही गंभीर प्रश्न निर्माण करणारी बाब आहे. एकीकडे नगराध्यक्षांच्या वार्डासह संपुर्ण तिर्थक्षेत्र तहानलेले असताना दुसरीकडे नगराध्यक्ष 'लोकशाही'त विकासाभिमुख कार्य केल्याच्या बड्या बाता मारत आहेत. तथापि, स्थानिक पातळीवर संपुर्ण परिस्थिती अक्षरश: 'खरकटी' असताना विकासाभिमुख कार्याच्या 'गोंडस' नावाखाली सन्मान विकत घेतल्याचा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्ते केशव भगत यांनी केला असून ही बाब संपुर्ण माहूरकरांच्या पचनी पडत नसल्याचे उपरोधात्मक मत भगत यांनी व्यक्त केले आहे...

Post a Comment
0 Comments