Type Here to Get Search Results !

‘पुस्तकांचे गाव’ उपक्रमाचे प्रभावी नियोजन करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


अहिल्यानगर, दि. ५ : वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागात ज्ञानाचा प्रसार व्यापक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘पुस्तकांचे गाव’ या महत्त्वाकांक्षी योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून उपक्रमाचे सुसूत्र नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पुस्तकांचे गाव-विस्तार’ योजनेअंतर्गत जिल्ह्यात ‘पुस्तकांचे गाव’ उभारण्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.


यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, तहसीलदार नागेश गायकवाड, जिल्हा ग्रंथालय निरीक्षक रामदास शिंदे, मराठी भाषा समिती सदस्य किशोर मरकड, संजय कळमकर, शशिकांत नजन तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, वाचन संस्कृती ही समाजाच्या बौद्धिक विकासाचा पाया आहे. ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी आणि युवकांना दर्जेदार साहित्य सहज उपलब्ध व्हावे, यासाठी ‘पुस्तकांचे गाव’ ही संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ज्ञान, साहित्य आणि संस्कृतीचा प्रसार अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होईल.


पुस्तकांचे गाव उभारताना स्थानिक वैशिष्ट्ये, उपलब्ध जागा, वाचन संस्कृतीची परंपरा तसेच पर्यटनविकासाची क्षमता यांचा विचार करावा. हा उपक्रम केवळ पुस्तक विक्री किंवा प्रदर्शनापुरता मर्यादित न ठेवता वाचन प्रेरणा उपक्रम, साहित्यिक कार्यक्रम, ग्रंथदालन, अभ्यासिका आणि सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश असलेले ज्ञानकेंद्र विकसित करण्यावर भर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.


बैठकीत ‘पुस्तकांचे गाव-विस्तार’ योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील संभाव्य ठिकाणे, उपलब्ध सुविधा, आवश्यक पायाभूत व्यवस्था तसेच उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यात येणाऱ्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला.

Post a Comment

0 Comments