Type Here to Get Search Results !

माहूरगड दर्शनासह आध्यात्मिक क्षेत्र, परंतु सुविधांचा अभाव; भाविकांमध्ये नाराजी




माहूर प्रतिनिधी

आदित्य खंदारे 


साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री रेणुकामाता मंदिरामुळे माहूरगडाला देशभरातून भाविक भेट देतात. धार्मिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व लाभलेल्या या तीर्थक्षेत्रात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असले तरी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अनेकांना गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.


माहूरगडावर दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांनी येथे राहण्याची, स्वच्छतेची व इतर सोयीसुविधांची कमतरता असल्याची खंत व्यक्त केली आहे. विशेषतः कुटुंबासह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मुक्कामासाठी पुरेशा प्रमाणात सुसज्ज भक्तनिवास उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अनेक भाविकांना दर्शन घेऊन तातडीने परतीचा प्रवास करावा लागतो.


काही भाविकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "माहूरगड हे अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक क्षेत्र आहे. मात्र येथे उपलब्ध असलेल्या सुविधांची स्थिती पाहता भविष्यात आपल्या मुलांना व कुटुंबियांना येथे पाठवावे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. जर शासन व मंदिर प्रशासनाने योग्य नियोजन करून आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या तर भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते."


भाविकांच्या मते, मंदिर परिसरात सुसज्ज भक्तनिवास, स्वच्छ प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पार्किंग, विश्रांतीगृहे तसेच मार्गदर्शक फलक यांची नितांत आवश्यकता आहे. या सुविधा निर्माण झाल्यास केवळ भाविकांची सोय होणार नाही तर स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील.


याशिवाय काही भाविकांनी मंदिरातील ओटी भरण्याच्या प्रक्रियेबाबतही नाराजी व्यक्त केली आहे. रेणुकामातेची ओटी भरताना काही पुजाऱ्यांकडून ओटीजवळ पैसे ठेवण्यासाठी आग्रह केला जात असल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली. श्रद्धा व भक्तिभावातून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अशा प्रकारच्या अनुभवामुळे मानसिक खंत वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. मंदिर परिसरात देणगी व दक्षिणा याबाबत पारदर्शक व्यवस्था असावी, अशी मागणीही भाविकांकडून करण्यात येत आहे.


माहूरगड हे महाराष्ट्राच्या धार्मिक पर्यटनाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे शासन, मंदिर प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी भाविकांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक सुविधा निर्माण कराव्यात, अशी अपेक्षा भाविकांमधून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments