Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

यवतमाळ l जेंडर बजेटिंग व जेंडर सेन्सिटायझेशन विषयावरील प्रशिक्षणातून संवेदनशील प्रशासनाची जडणघडण




 विविध विभागांच्या उत्स्फूर्त सहभाग


मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻 8208166961/9860020016 


 यवतमाळ :- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शासकीय अधिकाऱ्यांसाठी “जेंडर बजेटिंग व जेंडर सेन्सिटायझेशन” या विषयावरील एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.


कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर प्रेरणागीत सादर करण्यात आले.


कार्यक्रमास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मारोती पवार, कार्यकारी संचालक सम्यक पुणे आनंद पवार विभागीय सल्लागार माविम अमरावती विभाग केशव पवार, प्रशिक्षण तज्ज्ञ माविम मुंबई सुमेध हराळकर, तसेच जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांची प्रमुख उपस्थिती होती.


प्रास्ताविकात सुनील सोसे यांनी प्रशिक्षणाच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकत स्त्री-पुरुष समानता, जेंडर बजेटिंग आणि संवेदनशील प्रशासन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. विविध विभागांच्या योजनांच्या अंमलबजावणीत महिलांचा सहभाग, त्यांच्यापर्यंत पोहोचणाऱ्या सेवांची परिणामकारकता आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा समावेश यासाठी जेंडर दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.


मारोती पवार यांनी मार्गदर्शन करताना महिला व बालकांशी संबंधित योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने कार्य करणे गरजेचे असल्याचे सांगितले. शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत समानतेने पोहोचला पाहिजे, यासाठी जेंडर बजेटिंगची संकल्पना महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


केशव पवार यांनी जेंडर मुख्यप्रवाहीकरण, धोरणात्मक नियोजन आणि शासकीय यंत्रणांमध्ये जेंडर दृष्टीकोनाची आवश्यकता यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तर सुमेध हराळकर यांनी प्रशिक्षणाच्या उद्दिष्टांबाबत माहिती देत जेंडर संवेदनशीलतेमुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख व परिणामकारक बनत असल्याचे सांगितले.


मुख्य प्रशिक्षक आनंद पवार यांनी जेंडर बजेटिंगची संकल्पना, स्त्री-पुरुष समानतेचे सामाजिक व आर्थिक पैलू, शासकीय योजनांमधील जेंडर विश्लेषण तसेच प्रशासनातील जबाबदाऱ्या याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून जेंडर संवेदनशील दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.


कार्यशाळेस तालुका कृषी अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, संरक्षण अधिकारी, विविध विभागांचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी, माविमचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ व महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सर्व मान्यवर, प्रशिक्षक व सहभागी अधिकारी यांचे आभार मानण्यात आले.

Post a Comment

0 Comments