Type Here to Get Search Results !

२२ वर्षांच्या समर्पित सेवेला सन्मानाची मानवंदना; भारती फिरके मॅडम यांचा भावपूर्ण निरोप समारंभ संपन्न



सेवानिवृत्तीनिमित्त शाळेला संगणक, वनवासी विकास प्रकल्पाला ₹११ हजारांची देणगी; विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ मान्यवरांकडून गौरवली


अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी 


तलासरी :- छत्रपती शिक्षण मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय, तलासरी येथील सहशिक्षिका भारती विलास फिरके (बी.एस्सी., बी.एड.) या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल शाळेत त्यांचा निरोप व सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तब्बल २२ वर्षांच्या निस्वार्थ, प्रामाणिक आणि विद्यार्थीकेंद्रित सेवेला या कार्यक्रमातून कृतज्ञतापूर्वक सलाम करण्यात आला.


कार्यक्रमास छत्रपती शिक्षण मंडळाचे कल्याण कार्यकारिणी सदस्य छगन वावरे  प्रमुख उपस्थित होते. त्यांनी फिरके मॅडम यांनी शाळेच्या उभारणीत, शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचे कौतुक करत संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार केला. तसेच संस्थेचे सरचिटणीस डॉ. निलेश रेवगडे यांचा शुभेच्छा संदेश आणि सन्मानचिन्हही त्यांना प्रदान करण्यात आले.


शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक दीपक पाटील यांनी आपल्या मनोगतात फिरके मॅडम यांच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यातील तळमळ, वक्तशीरपणा, शिस्तप्रिय स्वभाव आणि अनेक विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यातील त्यांच्या मोलाच्या योगदानाचा गौरव केला.


यावेळी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे राज्य सदस्य सुरेश शिंदा यांनीही फिरके मॅडम यांच्या अभ्यासू वृत्तीचे आणि विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जपलेली परंपरेचे विशेष कौतुक केले.


आपल्या मनोगतात भारती फिरके यांनी २२ वर्षांच्या सेवाकाळातील विविध आठवणी, अनुभव आणि विद्यार्थ्यांशी जुळलेले भावनिक नाते उपस्थितांसमोर उलगडले. शाळा, संस्था, सहकारी शिक्षक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.


समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत फिरके मॅडम यांनी शाळेला एक संगणक भेट दिला, तसेच वनवासी विकास प्रकल्पासाठी ₹११ हजारांची देणगी जाहीर करून आपल्या सेवाभावी वृत्तीचा परिचय दिला.


कार्यक्रमास गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ठक्कर बाप्पा शाळेचे माजी मुख्याध्यापक अशोक भुळकुंडे, माजी मुख्याध्यापक सुरेश महाजन, डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे शाखाप्रमुख गायकर साहेब, सखाराम गावित, वसंतदादा भुसारा, शिक्षक-पालक संघाचे पदाधिकारी, पालक, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम काटे यांनी केले, मनीषा धनवडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर अर्चना ठाकरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


समारोपानंतर विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने गोड जेवण देण्यात आले. भारती फिरके मॅडम यांच्या दीर्घ, समर्पित आणि प्रेरणादायी शैक्षणिक सेवेला उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना दिली.

Post a Comment

0 Comments