Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

माणगांवच्या गोरक्षनाथ मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात - गीता, संत साहित्य आणि गुरुविचारांनी भक्त भारावले...




प्रतिनिधी :-सचिन पवार 

माणगांव, रायगड :-माणगांव येथील श्री गोरक्षनाथ मंदिर, नवनाथ सत्संग मंडळ या ठिकाणी गुरुपौर्णिमा निमित्त "ज्ञान, संस्कार आणि जीवनाला दिशा देणारा दीपस्तंभ म्हणजे गुरु" हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात "गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः । गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥"या श्लोकाने झाली. त्यानंतर पंचोपचार पुजा, हवन विधी, आरती व तीर्थप्रसाद घेण्यात आले.

यावेळी रायगड भूषण प.पू. गुरुवर्य श्री. दादा महाराज शिंदे व रायगड भूषण प.पू. गुरुवर्य श्री. यशवंत महाराज गायकवाड यांच्या कृपाशीर्वादाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ज्येष्ठ गुरुवंधू श्री. वामनराव म्हसके यांनी भगवद्गीता अध्याय १७ व्या मधील १४ श्लोक वरील प्रवचन केले. त्यात त्यांनी सांगितले की, गीतेत सांगितल्याप्रमाणे सत्व, रज, तम या तीन गुणांच्या पलीकडे जाऊन मनुष्याने गुरूंच्या मार्गदर्शनाने आत्मज्ञान प्राप्त करावे.

प्रवचनात संत ज्ञानेश्वर माऊलींचे "विश्वात्मक देवाचे करुनी प्राण" आणि संत तुकाराम महाराजांचे "अभंग, कीर्तन, हरिपाठ" यातील गुरु महात्म्यावरील विचार मांडण्यात आले. 

वक्त्यांनी सांगितले की, गुरुचे विचार हेच जीवनाला प्रेरणा देणारे आहेत. गुरु आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात. ते केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रामाणिकपणा, शिस्त, संयम, कष्ट, सचोटी, देशप्रेम आणि समाजसेवेचे संस्कार घडवतात.

कार्यक्रमात भगवान श्रीकृष्ण आणि सांदीपनी ऋषी, छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी* यांच्या गुरु-शिष्य परंपरेची उदाहरणे देऊन गुरुंचे महत्त्व पटवून देण्यात आले.

शेवटी नविन नामधारक दिक्षाविधी, महाप्रसाद, हरिभजन आणि श्री सद्गुरु पादुकांचे पुजन व दर्शन सोहळा पार पडला. 

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक, विद्यार्थी आणि गुरुजन उपस्थित होते. सर्वांनी गुरुंच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक होऊन त्यांच्या शिकवणुकीनुसार जीवन जगण्याचा संकल्प केला.

"गुरूंचा सन्मान म्हणजे ज्ञानाचा सन्मान, संस्कारांचा सन्मान आणि उज्ज्वल भविष्याचा सन्मान."

Post a Comment

0 Comments