✍️भवन लिल्हारे भंडारा गोंदिया जिल्हा प्रतिनिधी मो.नं.9373472847 /8888519894
भंडारा ( मांडेसर ) : दिनांक २३ जुलै २०२६ भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील मौजा मांडेसर येथील जि.प. उच्च प्राथ.शाळेत महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशानुसार दिनांक २२ जुलै रोजी राज्याचे माजी दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित (दादा) पवार यांची जयंती प्रथमच साजरी करण्यात आली. प्रारंभी दादांच्या प्रतिमेला पुष्पहार व उपस्थित ग्रामस्थांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. व भावपूर्ण आदरांजली वाहिली.
सहाय्यक शिक्षक नामदेव टांगले सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून मान्यवर पाहुण्यांचे स्वागत हार व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
यावेळी त्यांच्या सामाजिक न्याय, सर्वसमावेशक विकास आणि गोरगरीब, दलित, पीडित, शोषित, अल्पसंख्याक, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व आदिवासी समाजाच्या न्यायासाठी केलेल्या कार्याचा उपस्थितांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वित्त व आरोग्य सभापती मा. आनंदभाऊ मलेवार यांनी उपस्थितांना मागदर्शन करत वेळेला आणि शब्दाला पक्के नेते रोखठोक भूमिका ही होती अजितदादांची ओळख
महाराष्ट्राच्या मातीत आजवर अनेक राजकारणी होऊन गेले. मात्र काही राजकारणी मंडळी सदैव जनतेच्या मनावर राज्य करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात २८ जानेवारी २०२६ ही तारीख कधीच पुसता येणार नाही. दुर्दैवी विमान अपघातात अवघ्या महाराष्ट्राने आपला लाडका नेता गमावला. आज राज्याचे लाडके नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस. मात्र हा आनंद साजरा करण्यासाठी अजित दादा आपल्यामध्ये नाहीत, हे कोणाच्याच मनाला पटत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार नावाचा सूर्य पाहायला मिळाला की, ज्यांच्या शिस्तबद्ध कामाची पद्धत अवघा महाराष्ट्र आणि देश जाणत होता. काटेकोर वेळ पाळणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख होती. महाराष्ट्राच्या जनतेसाठी, राज्याच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत करणारा एक कणखर माणूस म्हणजे आपले सर्वांचे अजितदादा.
बारामतीच्या मातीतून आपल्या राजकारणाची सुरुवात अजित पवारांनी केली. तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी दादांचा संपर्क असे. अजित दादा केवळ राजकारणी किंवा उपमुख्यमंत्री नव्हते, तर राज्याच्या जनतेशी, कार्यकर्त्यांची जोडलेला एक विश्वास होता. त्यांच्या विकासाचे व्हीजन आणि वेगाने निर्णय घेत कामे मार्गी लावण्याची ताकद होती. अनेक वर्षे त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम केले. राज्याच्या अर्थकारणाचा डोलारा सांभाळताना त्यांनी सर्वसामान्य जनतेपासून ग्रामीण विकास ते अन्य प्रगतीसाठी महत्वाच्या गोष्टींना कायम महत्व दिले.
अजितदादा पवार केवळ एक राजकारणी नव्हते. तर प्रशासनात असलेला एक शिस्तीचा मजबूत कणा होता. ठरलेल्या दिवसभरातील कार्यक्रमांना वेळेत हजेरी लावणे, प्रत्येकाची समस्या ऐकून घेणे आणि त्या सोडवणे असा त्यांचा कामाचा धडाका होता. अजितदादा आपल्या वक्तृत्व शैलीने कायमच सर्वांना प्रभावित करत असत. अनेकदा राजकीय सभा किंवा अन्य भाषणात एखादा विनोदी भाष्य करत सर्वांना हवहवेसे वाटणारे दादा आज आपल्यात नाही. हे दुःख आहे.
सत्तेत असो वा विरोधात असो अजित पवारांचे सर्वांशीच चांगले संबंध होते. राज्याचे उपमुख्यमंत्रीपद सर्वाधिक वेळेस भूषवणारा नेता म्हणून त्यांनी रेकॉर्ड केला. विकासकामे करणे, सर्वांच्या अडचणीत मदत करणे.असा त्यांचा स्वभाव होता. मात्र आज त्यांचा वाढदिवस आहे आणि दादा आपल्यात नाहीत हे दु:ख अद्याप पचवता येत नाही.
२८जानेवारी २०२६ हा दिवस आला नसता तर किती चांगले झाले असते ? असे वाटते. कारण या दिवशी महाराष्ट्राने केवळ एक नेता नव्हे तर आपल्या कुटुंबाचा सदस्य गमावला. ज्या मातीने त्यांना घडवले, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावर आणले त्याच बारामतीमध्ये त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. तो दिवस संपूर्ण महाराष्ट्राची हानी करून गेला. लाखो कार्यकर्त्यांची आणि राज्याच्या राजकारणाची कधीही न भरून निघणारी ती जखम आहे. ‘आज दादा असते तर..’ ही खंत प्रत्येकाच्या मनाला कुठेतरी अस्वस्थ करत आहे. आज अजित दादा शरीर रूपाने आपल्यात नाहीत. मात्र त्यांनी ठेवलेला विचार, त्यांनी मांडलेले विकासाचे व्हिजन अद्याप प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात कायम आहे. असे प्रतिपादन आनंदभाऊ मलेवार ( अर्थ व आरोग्य सभापती ) यांनी केले.
यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मांडेसर गावाचे प्रथम नागरिक मा. गुलाब सव्वालाखे , उपसरपंच रोशन लिल्हारे, तं. मुक्ती समिती अध्यक्ष दुर्योधन अटराहे, शा. व्य. समिती अध्यक्ष भवन लिल्हारे, उपाध्यक्ष रवी बशिने, जेष्ठ नागरिक किशोर सव्वालाखे , सहाय्यक शिक्षक नरेन्द्र निंबार्ते, उमेश दमाहे, पाहुनी येथील सरपंच, ग्रा.पं. परिचारक आशिष सव्वालाखे, विद्यार्थी विदयार्थींनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
आभार नामदेव टांगले ( सहाय्यक शिक्षक ) जि.प. उच्च प्राथ.शाळा मांडेसर यांनी मानले हे खास .

Post a Comment
0 Comments