Type Here to Get Search Results !

गडचिरोलीचा स्वतंत्र ब्रँड विकसित करा:जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा




क्रॉपसॅप, पीएमएफएमई व कपास कांती अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा व आढावा सभा संपन्न


मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


गडचिरोली : - प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन करून त्यांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्याचा स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड विकसित करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना त्यांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी समन्वयाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि कपास कांती अभियान अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा व आढावा सभेत ते मार्गदर्शन करत होते.

कार्यशाळेत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, क्रॉपसॅप, कपास कांती अभियान, ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड (AIF) तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा शेतीतील वापर या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

खरीप हंगामाच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेचे सक्षमीकरण, पीक संरक्षणाबाबत वेळेवर मार्गदर्शन, कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन तसेच ग्रामीण भागात अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी सांगितले.

नोडल अधिकारी तथा कृषी उपसंचालक श्रीमती मधुगंधा गौतम-जुलमे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची कार्यपद्धती, उद्दिष्टे, लाभार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा आणि अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला.

विस्तार विभागाचे तांत्रिक अधिकारी श्री. गणेश दुरंदे यांनी 'क्रॉप्स २.०' ॲपच्या वापराबाबत तांत्रिक सादरीकरण करून डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पीक पाहणी, माहिती संकलन आणि शेतकऱ्यांपर्यंत तांत्रिक सल्ला प्रभावीपणे पोहोचविण्याची प्रक्रिया स्पष्ट केली.

Post a Comment

0 Comments