Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

भामरागडला पुन्हा पुराचा विळखा : संपर्क तुटला नवीन पूल झाला तरी बाजारपेठ सुरक्षित राहणार का?



विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931

भामरागड : तालुक्यात पावसाचा जोर कायम असून सोमवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पर्लकोटा नदीवरील मुख्य पुलावर पुन्हा पाणी चढले.यामुळे भामरागडचा इतर भागांशी असणारा संपर्क पुन्हा एकदा पूर्णपणे तुटला आहे. विशेष म्हणजे, चालू पावसाळी मोसमात पर्लकोटा पुलावर पाणी साचण्याची ही दुसरी वेळ आहे. अवघ्या महिनाभरात दुसऱ्यांदा आलेल्या या पुरामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र घबराट पसरली आहे.

मागील महिन्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान आलेल्या महापुराने भामरागड शहरासह संपूर्ण तालुक्याला झोडपून काढले होते आणि मोठे नुकसान केले होते. नागरिक अद्याप त्या पुराच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच, पर्लकोटा नदीच्या पाण्याचा प्रवाह पुन्हा वेगाने वाढल्याने सखल भागातील व्यापाऱ्यांची व रहिवाशांची धाकधूक वाढली आहे.

भामरागडला जोडणाऱ्या नवीन उच्चस्तरीय पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर पुलावरून वाहतुकीची समस्या काही प्रमाणात सुटू शकते. मात्र, पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती या तिन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर हे पाणी पुलावरून पुढे येऊन भामरागडच्या मुख्य चौक, बाजारपेठ आणि सखल भागांत शिरते. त्यामुळे केवळ नवीन पूल बांधल्याने शहराचा पूरप्रश्न कायमस्वरूपी कसा सुटणार, असा थेट आणि तीव्र सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

पूल उंच झाला आणि रस्ता पक्का झाला, तरीही पुराचे पाणी मुख्य बाजारपेठेत शिरून लाखोंचे नुकसान करणार असेल, तर त्याचा सर्वसामान्यांना किती फायदा होणार? असा प्रश्न आता विचारला जात आहे. भामरागडच्या पूरप्रश्नावर केवळ तात्पुरत्या मलमपट्टीपेक्षा शहराचे भौगोलिक स्वरूप, नदीपात्र, पाण्याचा प्रवाह आणि बाजारपेठेची सखल पातळी यांचा सखोल अभ्यास करून व्यापक व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. नवीन पुलामुळे दळणवळणाचा प्रश्न सुटेल; पण भामरागड शहराला पुराच्या विळख्यातून वाचवण्यासाठी शासन आणि प्रशासन कधी ठोस पावले उचलणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments