बांधकामातील त्रुटी आणि जबाबदारी होणार निश्चित
विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील कोठी-कोरणार पूल कोसळल्याच्या घटनेनंतर तब्बल २२ दिवसांनी राज्य शासनाने चौकशी समिती स्थापन केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने २१ ऑगस्ट रोजी शासन परिपत्रक काढून या पुलाच्या कामाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठित केली. पुलाच्या बांधकामाची गुणवत्ता, संकल्पनातील त्रुटी आणि पूल कोसळण्यामागील कारणांचा समिती अभ्यास करणार आहे.
कोठी - रेंगानदी - पिपळीगुंडी रस्त्यावरील हा पूल ३१ जुलै रोजी अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात खचला होता. या घटनेमुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलेला हा पूल अवघ्या ३ वर्षांतच कोसळल्याने बांधकामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यासंदर्भात विविध संघटनांनी आंदोलन देखील केले होते. यावेळी अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांच्या निलंबनाची व त्यांच्या कार्यकाळातील सर्व कामांच्या चौकशीचीही मागणी करण्यात आली होती.
शासनाच्या आदेशानुसार भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक सोविक बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्य अभियंता, संकल्पचित्र विभाग नवी मुंबई हे समितीचे सचिव, तर अधीक्षक अभियंता, दक्षता व गुणनियंत्रण मंडळ, नागपूर हे सदस्य सचिव असतील.
समिती पूल खचल्याची कारणे, कामाची गुणवत्ता आणि कामाच्या तपासणी प्रक्रियेचा अभ्यास करणार आहे. तसेच अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि पुलाच्या दुरुस्ती अथवा पुनर्बांधणीसंदर्भातही समिती सूचना करणार आहे. समितीने आपला अहवाल शासनाला ३० दिवसांत सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पूल कोसळल्यानंतर चौकशीसाठी समिती स्थापन करण्यास २५ दिवसांचा कालावधी लागल्याने या चौकशीच्या अहवालाकडे आता लक्ष लागले आहे. अहवालातून पुलाच्या बांधकामातील त्रुटी आणि जबाबदारी निश्चित होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments