Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

एटापल्ली आठवडी बाजारात मलेरिया-डेंग्यू जनजागृती अभियान

 


माडीया व गोंडी भाषेतील जिंगल्सद्वारे नागरिकांना प्रतिबंधात्मक उपायांची माहिती


विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931

  एटापल्ली :- तालुका आरोग्य अधिकारी, एटापल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली येथील आठवडी बाजार परिसरात मलेरिया, डेंग्यू तसेच इतर कीटकजन्य आजारांबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले.


या अभियानादरम्यान आठवडी बाजारात उपस्थित नागरिकांना मलेरिया व डेंग्यूची लक्षणे, आजारांची कारणे तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात आली. घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, परिसर स्वच्छ ठेवणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे तसेच ताप आल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.


एटापल्ली परिसरातील नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक संदेश प्रभावीपणे पोहोचावा यासाठी *माडीया व गोंडी भाषेतील जनजागृती जिंगल्स* वाजविण्यात आले. स्थानिक भाषेतून आरोग्यविषयक माहिती देण्यात आल्याने नागरिकांमध्ये मलेरिया व डेंग्यूबाबत जागरूकता निर्माण करण्यास मदत झाली.


मलेरिया व डेंग्यू नियंत्रणासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, परिसरातील स्वच्छता राखणे आणि डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.


या जनजागृती अभियानास CHO सोनू वड्डे मॅडम, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, श्री. श्रावण राठोड (तालुका कीटकशास्त्रज्ञ), सोनाली कोराम (TCI) तसेच बंडू दामले, तालुका समन्वयक - मलेरिया, CHAI Foundation यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.


नागरिकांनी ताप, थंडी वाजणे, डोकेदुखी, अंगदुखी यांसारखी लक्षणे जाणवल्यास दुर्लक्ष न करता आरोग्य केंद्राशी संपर्क साधून आवश्यक तपासणी करून घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Post a Comment

0 Comments