Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

एमपीएससी परीक्षा पद्धतीतील सुधारणांबाबत गडचिरोलीतील परीक्षार्थींच्या सूचना




उच्चस्तरीय समितीसमोर ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी, अपेक्षा मांडल्या


प्रमोद एन. चिंतलवार 

तालुका प्रतिनिधी गडचिरोली 

मो. नं. 9405133420


गडचिरोली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासह राज्यातील शासकीय भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह आणि उमेदवारकेंद्रीत करण्याच्या दृष्टीने पूर्व विदर्भातील परीक्षार्थींशी बुधवारी नागपुरात थेट संवाद साधण्यात आला. या संवादामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींच्या अडचणी, अपेक्षा आणि सूचनांनाही महत्त्व देण्यात आले.


सदर येथील जिल्हा नियोजन भवनात उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्ष तथा अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा आणि समितीच्या इतर सदस्यांनी परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक व नागरिकांशी संवाद साधून परीक्षा प्रक्रियेबाबतच्या सूचना जाणून घेतल्या.


गडचिरोलीसारख्या ग्रामीण आणि दुर्गम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचताना येणाऱ्या अडचणी, प्रवासाचा खर्च, केंद्रांची उपलब्धता, परीक्षा वेळापत्रकाची पूर्वसूचना आणि डिजिटल माध्यमातून वेळेवर माहिती मिळण्याची गरज यासह विविध विषयांवर चर्चा झाली.


एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित परीक्षा वेळापत्रक, परीक्षा केंद्रांचे नियोजन, अभ्यासक्रमातील बदल, प्रश्नपत्रिकेची गुणवत्ता, परीक्षा आयोजनातील पारदर्शकता, निकाल जाहीर करण्यास लागणारा कालावधी तसेच भरती प्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबत परीक्षार्थींनी सूचना मांडल्या.


विशेषतः गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा, अभ्यासिका, मार्गदर्शन, इंटरनेट व डिजिटल साधनांची उपलब्धता तसेच परीक्षा केंद्रांसाठी इतर जिल्ह्यांत करावा लागणारा प्रवास या बाबींचा विचार परीक्षा धोरण ठरविताना व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


परीक्षा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उमेदवारांची सुरक्षितता आणि परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता राखण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.


उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांनी परीक्षार्थींशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना जाणून घेतल्या. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे प्रत्यक्ष अनुभव आणि अडचणी समजून घेऊन भविष्यातील परीक्षा पद्धती अधिक सुलभ व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने हा संवाद महत्त्वाचा मानला जात आहे.


गडचिरोली जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींनी मांडलेल्या ग्रामीण व दुर्गम भागाशी संबंधित मुद्द्यांची समितीने नोंद घेतली असून, परीक्षा पद्धतीतील सुधारणांमध्ये या बाबींचा विचार होण्याची अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments