Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

कोटमी–पैडी–जडेगाव–जमगाव–राजोली रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा; चौकशीची CPIची मागणी




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


एटापल्ली :-  तालुक्यातील कोटमी–पैडी–जडेगाव–जमगाव–राजोली हा महत्त्वाचा संपर्क रस्ता सध्या अत्यंत खराब झाला असून त्याची तातडीने दर्जेदार दुरुस्ती करावी, तसेच पूर्वी झालेल्या रस्ता बांधकामाची तांत्रिक चौकशी करावी, अशी मागणी CPIच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना तहसीलदार, एटापल्ली यांच्या मार्फत देण्यात आले.


या रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या कडाही खराब झाल्या असून पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून जीवितहानीची शक्यताही निर्माण झाली आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान होऊन नागरिकांना वित्तहानी सहन करावी लागत आहे.


या मार्गाचा विद्यार्थी, महिला, वृद्ध, दिव्यांग, युवक, शेतकरी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात वापर करतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यास, महिलांना दैनंदिन कामांसाठी प्रवास करण्यास आणि वृद्ध व दिव्यांग नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करण्यास अडचणी येत आहेत. युवक व कामगारांच्या रोजगाराशी संबंधित प्रवासावरही त्याचा परिणाम होत आहे.


रुग्णांच्या बाबतीत परिस्थिती अधिक गंभीर आहे. रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात नेताना खराब रस्त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढत असून रुग्णवाहिकांनाही खड्ड्यांमधून मार्ग काढताना अडचणी येतात. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात विलंब होण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे


 रस्त्याच्या दुरवस्थेचा परिणाम शासकीय कामकाजावरही होत आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी गावागावांत जाणाऱ्या यंत्रणांना या मार्गावरून प्रवास करताना अडचणी येतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा व कामांसाठी ये-जा करताना वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहेत.


CPIने केवळ खड्डे बुजविण्याची तात्पुरती डागडुजी न करता रस्त्याची सखोल तांत्रिक पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी मजबुतीकरण, खराब झालेले थर काढून पुनर्बांधणी आणि दर्जेदार पुनर्डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. तसेच पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक ठिकाणी नाली व कल्व्हर्टची व्यवस्था आणि रस्त्याच्या कडांची मजबुती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


सदर रस्ता “Road Connectivity Project for Left Wing Extremism Affected Areas” अंतर्गत करण्यात आलेला आहे. उपलब्ध निविदा नोंदीनुसार कामाचे नाव 

“Construction of Kotmi–Paidi–Jadegaon–Jamgaon–Rajoli Road” असून रस्ता क्रमांक VR-4, VR-147, VR-141 व VR-41 असा नमूद आहे. या कामाची निविदा MH-1014 तसेच NIT No. 01-2/RCPLWE/2018-2019 अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली असून निविदा 13 एप्रिल 2018 रोजी प्रसिद्ध झाली होती.


या कामाचा Work Order, Agreement, काम सुरू व पूर्ण झाल्याच्या तारखा आणि Completion Certificate यांची अधिकृत माहिती देण्याची मागणी CPIने केली आहे. तसेच प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, मंजूर अंदाजपत्रक, निविदा व अंतिम करार रक्कम, संबंधित कंत्राटदाराचे नाव, Measurement Book, अदा केलेली बिले, Quality Control अहवाल, साहित्य चाचणी अहवाल आणि Defect Liability Period यांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


रस्ता बांधकाम पूर्ण झाल्यानंतर काही वर्षांतच त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या विविध थरांची जाडी, वापरण्यात आलेले डांबर, खडी, मुरूम व इतर साहित्याची गुणवत्ता तसेच बांधकामाच्या वेळी तांत्रिक निकषांचे पालन झाले की नाही, याची तपासणी करण्यासाठी नमुने घेऊन प्रयोगशाळेत चाचणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


Defect Liability Period लागू असल्यास करारातील अटींनुसार संबंधित कंत्राटदाराकडून कोणताही अतिरिक्त सरकारी खर्च न करता दुरुस्ती करून घ्यावी. चौकशीत निकृष्ट काम किंवा अनियमितता आढळल्यास संबंधित कंत्राटदार तसेच देखरेखीस जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी CPIने केली आहे.


याच मार्गावरील कि.मी. 8/760 येथे पोहर नाल्यावर पूल बांधकामासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आली होती. त्यामुळे संबंधित पुलाची तसेच रस्ता-पूल जोडणीच्या ठिकाणाचीही प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


CPIचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “रस्त्याची काही वर्षांतच झालेली दुरवस्था ही गंभीर बाब आहे. खराब रस्त्यामुळे अपघात, जीवितहानी व वित्तहानीचा धोका वाढला असून रुग्ण, विद्यार्थी, महिला, वृद्ध, दिव्यांग, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याची तातडीने दर्जेदार दुरुस्ती करण्यासोबतच पूर्वीच्या कामाची निष्पक्ष तांत्रिक चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे.”


निवेदन देताना कॉ. सुरज जककुलवार, कॉ. महादेव पदा, उपसरपंच कोटमी, कॉ. दीपक पदा, कॉ. दिनेश वडडे, कॉ. सोनू नरोटे, सचिन नरोटे, गनुजी नरोटे, अशोक कुमरे, मुकेश पोटावी यांच्यासह पैडी, जडेगाव, जमगाव तसेच परिसरातील इतर गावांतील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.


रस्त्याची तातडीने पाहणी करून दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करावे, आवश्यक निधी उपलब्ध करून दर्जेदार दुरुस्ती सुरू करावी आणि पूर्वीच्या कामाची तांत्रिक चौकशी करून त्यावरील कार्यवाहीची लेखी माहिती CPIला द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागण्या तातडीने पूर्ण न केल्यास CPIच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments