Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

नागुलवाडीतील नाल्यांची सफाई करा; CPIचे पंचायत समिती एटापल्लीला ७ दिवसांचे अल्टिमेटम




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

मो. ८२०८१६६९६१


एटापल्ली : - ग्रामपंचायत नागुलवाडी अंतर्गत नागुलवाडी गावातील नाल्यांची मागील पाच वर्षांहून अधिक काळ नियमित सफाई व गाळ उपसा करण्यात आलेला नसल्याने गावातील नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. नाल्यांची तात्काळ सफाई व गाळ उपसा करण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पंचायत समिती, एटापल्लीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत ७ दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे.


गावातील नागरिकांनी कॉ. सचिन मोतकुरवार यांना नागुलवाडी गावात आमंत्रित करून प्रत्यक्ष नाल्यांची दुरवस्था दाखवली. तसेच नाल्यांची सफाई व गाळ उपसा करून देण्यासाठी मदत करण्याची मागणी केली. नागरिकांनी मांडलेल्या समस्येची दखल घेत CPIच्या वतीने गावातील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.


पाहणीदरम्यान नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व घाण साचल्याचे दिसून आले. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसून परिसरात दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे CPIने म्हटले आहे.


CPIने पंचायत समिती, एटापल्लीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी स्वतः नागुलवाडी गावाला भेट देऊन नाल्यांची पाहणी करावी आणि ग्रामपंचायतीला गावातील सर्व नाल्यांची तात्काळ सफाई व गाळ उपसा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.


तसेच मागील पाच वर्षांतील नाली सफाई व गाळ उपशाच्या कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या कालावधीत नाली सफाईसाठी निधी मंजूर झाला होता का, प्रत्यक्ष कामे करण्यात आली होती का, तसेच प्रत्यक्ष काम न करता बिले काढण्यात आली आहेत का, याची तपासणी करण्याची मागणी CPIने केली आहे. अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी किंवा कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


नाली सफाईशी संबंधित कामांचे आदेश, अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका, बिले, देयक नोंदी आणि इतर संबंधित अभिलेखांची तपासणी करून मागील पाच वर्षांतील कामांची वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.


“नागुलवाडीतील नागरिकांनी मला गावात बोलावून नाल्यांची प्रत्यक्ष परिस्थिती दाखवली आणि सफाईसाठी मदत मागितली. गावातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचलेला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीने तात्काळ नाली सफाई व गाळ उपशाचे काम करावे. तसेच मागील कामांची चौकशी करून त्याची माहिती जनतेसमोर ठेवावी,” अशी मागणी CPIचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी केली.


CPIने निवेदन प्राप्त झाल्यापासून ७ दिवसांच्या आत नागुलवाडी गावातील सर्व नाल्यांची सफाई व गाळ उपसा करून काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. तसेच केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती CPIला देण्याची मागणी करण्यात आली आहे.


७ दिवसांच्या आत नाली सफाई व गाळ उपशाचे काम पूर्ण न झाल्यास, पंचायत समिती, एटापल्ली येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.


यावेळी कॉ.सचिन मोतकुरवार जिल्हा सहसचिव ,कॉ. सुरज जककुलवार, जिल्हा सदस्य, भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच नागुलवाडी गावातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments