Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

हक्काचे धान्य मिळवण्यासाठी पायपीट का? कान्हाळगावकरांच्या प्रश्नावर CPIचा आवाज




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

मो. ८२०८१६६९६१


एटापल्ली : शासनाकडून मिळणारे रेशन हे नागरिकांच्या हक्काचे धान्य आहे. मात्र ग्रामपंचायत जवेली बु. अंतर्गत कान्हाळगाव येथील नागरिकांना हे हक्काचे रेशन घेण्यासाठी सध्या कोटमी गावात जावे लागत आहे. कान्हाळगाव ते कोटमी अंतर दूर असल्याने रेशन मिळवण्यासाठी नागरिकांना मोठा प्रवास करावा लागत असून, महिला, वृद्ध, दिव्यांग, गरीब आणि मजूर कुटुंबांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


रेशन घेण्यासाठी दूरवर जाण्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होत आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना रेशन आणण्यासाठी कामाचा दिवस गमवावा लागण्याची परिस्थिती निर्माण होते. वृद्ध नागरिक आणि महिलांसाठी दूरचा प्रवास अधिक त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे “हक्काचे धान्य मिळवण्यासाठी पायपीट का?” असा सवाल कान्हाळगावातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


कान्हाळगावच्या नागरिकांच्या सोयीसाठी जवळचे आणि रस्त्याने जोडलेले कारका गाव अधिक सोयीचे आहे. त्यामुळे कान्हाळगावातील नागरिकांना कारका येथे नियमितपणे रेशन उपलब्ध करून दिल्यास त्यांची मोठी गैरसोय दूर होऊ शकते.


कान्हाळगावातील नागरिकांनी आपली ही समस्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्यासमोर मांडली. नागरिकांची समस्या जाणून घेतल्यानंतर CPIच्या वतीने तहसीलदार, एटापल्ली यांना निवेदन देऊन कोटमीऐवजी कारका येथे रेशन वितरणाची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली.


कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “रेशन हे गरीब आणि सामान्य नागरिकांच्या जगण्याशी जोडलेले आहे. आपल्या हक्काचे धान्य घेण्यासाठी नागरिकांना दूरवर जावे लागत असेल तर प्रशासनाने या समस्येकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. महिला, वृद्ध, दिव्यांग आणि मजूर नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन कारका येथे रेशन वितरणाची व्यवस्था तातडीने सुरू करावी.”


कान्हाळगावातील नागरिकांना त्यांच्या गावाच्या जवळच रेशन मिळावे, यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन कारका येथे नियमित रेशन वितरणाची व्यवस्था करावी, अशी मागणी CPIने केली आहे.


नागरिकांच्या या मागणीवर तातडीने कार्यवाही न झाल्यास त्यांच्या हक्कासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.


यावेळी कान्हाळगावातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह निवेदन साद करण्यात आले. हक्काचे रेशन मिळवण्यासाठी नागरिकांना होणारी पायपीट थांबवून जवळच्या कारका गावातच रेशन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments