विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931
एटापल्ली :- एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात खनिज उत्खनन होत असताना या खनिज संपत्तीचा विकासात्मक लाभ तालुक्याच्या दुर्गम आणि मागास भागांनाही मिळावा, अशी मागणी पुढे आली आहे. जारावंडी, कसनसूर व परिसरातील गावांचा जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) निधीत समावेश करून या भागासाठी विशेष विकास निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मुकेश कावळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सुरजागड परिसरातील खनिज उत्खननातून मिळणाऱ्या लोहखनिजाची वाहतूक जारावंडी परिसरापर्यंत होत असून येथे खनिजाचा साठा केला जात आहे. त्यामुळे जारावंडीचा या प्रकल्पाशी थेट आर्थिक व वाहतूकदृष्ट्या संबंध निर्माण झाला आहे. मात्र, खनिज उत्खनन क्षेत्रापासून अंतर अधिक असल्याचे कारण देत या भागाला विकास निधीपासून वंचित ठेवले जाऊ नये, अशी भूमिका कावळे यांनी मांडली आहे.
जारावंडी, कसनसूर आणि परिसरातील गावे एटापल्ली तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असून अत्यंत दुर्गम परिस्थितीत आहेत. या भागात आजही दर्जेदार रस्ते, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी, शिक्षण, रोजगार आणि इतर मूलभूत सुविधांची मोठी कमतरता आहे. एकीकडे जिल्ह्यातील खनिज संपत्तीमधून कोट्यवधी रुपयांचा महसूल निर्माण होत असताना दुसरीकडे खनिज वाहतूक आणि संबंधित आर्थिक हालचाली असलेल्या दुर्गम गावांचा विकास मात्र अपेक्षित वेगाने झालेला नाही, अशी नागरिकांची भावना आहे.
जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून खनिज प्रभावित भागांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. या निधीचा उपयोग आरोग्य, शिक्षण, रस्ते, पिण्याचे पाणी, शेती, सिंचन, कौशल्य विकास व रोजगारनिर्मितीसाठी करता येतो. त्यामुळे जारावंडी-कसनसूर परिसरासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करून DMF निधीतून आवश्यक कामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी ३ जून २०२६ रोजी मुकेश कावळे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर केले होते. मुख्यमंत्री सचिवालयाकडून सदर ई-मेल संबंधित विभागाकडे योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचे कळविण्यात आले. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही किंवा निर्णय झालेला नसल्याने कावळे यांनी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे पुनर्निवेदन देत जारावंडी, कसनसूर व परिसरातील गावांचा DMF विकास निधीत समावेश करून विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे
*खनिज संपत्तीचा लाभ स्थानिकांनाही द्या; रोजगारात प्राधान्याची मागणी*
या पार्श्वभूमीवर जारावंडी परिसरात लोहप्रकल्पाशी संबंधित कामे सुरू असल्याने स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे प्रकल्पातील विविध कामे, वाहतूक, सुरक्षा, बांधकाम, यंत्रसामग्री हाताळणी तसेच इतर पूरक व्यवसायांमध्ये स्थानिक युवक व नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी मुकेश कावळे यांनी केली आहे. खनिज संपत्तीचा लाभ केवळ महसूल आणि उद्योगांपुरता मर्यादित न राहता परिसरातील स्थानिक कुटुंबांच्या रोजगार व आर्थिक उन्नतीसाठीही मिळाला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment
0 Comments