आदिवासींच्या जीवाशी खेळ थांबवा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी पत्रकातून केली आहे.
जिमलगट्टा–कमलापूर–राजाराम परिसरातील दवाखान्यांची तातडीने तपासणी करा; दोषी आढळल्यास दवाखाने सील करून फौजदारी कारवाई करा.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मो. नं. 9420751809.
गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, कमलापूर, राजाराम व आसपासच्या ग्रामीण भागात वैध वैद्यकीय पात्रता व अधिकृत नोंदणी नसताना काही व्यक्तींकडून वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याच्या गंभीर तक्रारी स्थानिक नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. हा प्रकार सत्य असल्यास तो अत्यंत गंभीर असून गरीब व आदिवासी नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीवाशी थेट खेळ करणारा आहे.
या भागाच्या दौऱ्यादरम्यान अनेक स्थानिक नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून आपली व्यथा मांडली. काही ठिकाणी स्वतःला डॉक्टर म्हणून सादर करणाऱ्या व्यक्तींच्या वैद्यकीय पदवी, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अथवा संबंधित वैद्यकीय परिषदेकडील नोंदणी, औषध विक्री परवाना तसेच उपचार करण्याच्या वैधानिक अधिकाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होत नसल्याचा गैरफायदा घेत, कोणतीही अधिकृत पात्रता नसलेल्या व्यक्तींकडून उपचार होत असतील तर प्रशासनाने ही बाब केवळ किरकोळ तक्रार म्हणून न पाहता संभाव्य सार्वजनिक आरोग्याचा गंभीर धोका म्हणून हाताळणे आवश्यक आहे.
स्थानिक नागरिकांकडून पुढील गंभीर तक्रारी करण्यात आल्या आहेत —
१) औषधांची मनमानी दराने विक्री :
गरजू व गरीब आदिवासी रुग्णांना स्वतःजवळील औषधे बाजारभावापेक्षा जास्त दराने दिली जात असल्याचे आरोप आहेत.
२) योग्य तपासणीशिवाय उपचार :
रुग्णांची आवश्यक वैद्यकीय तपासणी न करता औषधे, इंजेक्शन अथवा इतर उपचार केले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
३) रुग्णांच्या जीविताला संभाव्य धोका :
अयोग्य औषधोपचारामुळे एखाद्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाली किंवा जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, हा गंभीर प्रश्न आहे.
४) प्रशासनाच्या देखरेखीवर प्रश्न :
इतक्या दुर्गम भागात कोण वैद्यकीय व्यवसाय करत आहे, त्याच्याकडे मान्यताप्राप्त पदवी आहे का, अधिकृत नोंदणी आहे का, औषधांचा वैध साठा आहे का आणि औषध विक्रीचा परवाना आहे का, याची नियमित तपासणी होत आहे की नाही याचीही चौकशी झाली पाहिजे.
एकीकडे शासन आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे; तर दुसरीकडे पात्रता नसलेल्या व्यक्तींकडून वैद्यकीय उपचार होत असतील, तर हा शासनाच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी गडचिरोली, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, अन्न व औषध प्रशासन तसेच संबंधित पोलीस प्रशासन यांनी संयुक्त विशेष तपासणी पथक स्थापन करून अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, कमलापूर, राजाराम व परिसरातील सर्व संशयित खासगी दवाखाने व वैद्यकीय व्यावसायिकांची तातडीने तपासणी करावी.
प्रत्येक संबंधित व्यक्तीकडील शैक्षणिक पात्रता, वैद्यकीय नोंदणी प्रमाणपत्र, दवाखाना नोंदणी, औषध साठा, औषध विक्री परवाना व उपचार नोंदी तपासण्यात याव्यात. तपासणीत नियमबाह्य किंवा बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय सिद्ध झाल्यास संबंधित दवाखाना तात्काळ सील करून लागू कायद्यानुसार कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी.
“आदिवासी व गरीब नागरिक हे प्रयोगासाठी उपलब्ध रुग्ण नाहीत. त्यांच्या अज्ञानाचा, गरिबीचा आणि दुर्गम भागातील आरोग्य सुविधांच्या अभावाचा फायदा घेऊन कोणीही त्यांच्या जीवाशी खेळत असेल तर ते मुळीच सहन केले जाणार नाही. प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा या प्रश्नावर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.”
— संतोष ताटीकोंडावार
जिल्हाध्यक्ष, गडचिरोली
जनकल्याण समाज उन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती

Post a Comment
0 Comments