Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

आझाद समाज पार्टीची धानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

 



गडचिरोली: - गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांच्या धर्तीवर धानोरा तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचे तातडीने सर्वेक्षण करून धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त घोषित करावे व आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी आझाद समाज पार्टी तालुका धानोरा च्या वतीने  जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनाच्या प्रती मा. कृषिमंत्री (म. रा), मा. तहसीलदार धानोरा आणि तालुका कृषी अधिकारी धानोरा यांनाही आवश्यक व तातडीच्या कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

निवेदनात नमूद केल्यानुसार, धानोरा तालुक्यातील शेतकरी प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असून शेती हेच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. मात्र, यावर्षी पावसातील अनियमितता, पावसाचा पडलेला मोठा खंड, पाण्याची तीव्र कमतरता यामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना शेतीचा खर्च, बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजुरी यांचा खर्च भागवणे कठीण झाले आहे. एकीकडे वाढता शेतीखर्च आणि दुसरीकडे उत्पादनाची अनिश्चितता यामुळे धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

गडचिरोली व चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त म्हणून दिलासा देण्याची कार्यवाही होत असताना, धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीचेही वस्तुनिष्ठ मूल्यमापन होणे गरजेचे आहे. केवळ तालुक्याच्या भौगोलिक सीमांमुळे किंवा प्रशासकीय वर्गीकरणामुळे संकटग्रस्त शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहू नयेत, अशी मागणी पक्षातर्फे करण्यात आली आहे.

आझाद समाज पार्टीने निवेदनातून प्रामुख्याने खालील मागण्या केल्या आहेत:

• धानोरा तालुक्यातील सर्व गावांमध्ये शेती व पिकांच्या नुकसानीचे तातडीने प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात यावे.

• पर्जन्यमान, पेरणीची स्थिती, पीक परिस्थिती, पिकांची उत्पादकता, जलस्रोतांची उपलब्धता आणि इतर लागू निकषांच्या आधारे धानोरा तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचे मूल्यमापन करण्यात यावे.

• बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी भरीव आर्थिक मदत आणि पीक विम्याचा लाभ तातडीने मंजूर करण्यात यावा.

• शेतकऱ्यांचे वीज बिल पूर्णपणे माफ करण्यात यावे.

• कृषी कर्जाचे पुनर्गठन (Restructuring) करून कर्ज वसुलीस तातडीने स्थगिती देण्यात यावी.

प्रशासनाने या गंभीर बाबीची त्वरित दखल न घेतल्यास, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आझाद समाज पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

हे निवेदन आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देण्यात आले. यामध्ये कार्याध्यक्ष म्हणून  रंजीत बांबोळे , वनिता के. उसेंडी महिला तालुका अध्यक्ष, गणेश लेनगुरे,  प्रकाश कस्तुरे, सुरेश मोडघरे, सतीश लेनगुरे, विशाल मोडघरे, रविंद्र पदा, मारोती कोवा आणि  अमर पदा आदींचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments