जनजागृती सेवा संस्थेतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त कल्याणमध्ये शिक्षकवृंदांचा सन्मान; सरस्वती मातेची प्रतिमा व सन्मानपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त
कल्याण प्रतिनिधी
गुरुनाथ तिरपणकर
कल्याण :- शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देणारे नसून, भावी पिढीचे चारित्र्य घडविणारे आणि समाजाला योग्य दिशा देणारे शिल्पकार आहेत. शिक्षकांचा सन्मान म्हणजे ज्ञान, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा सन्मान होय, अशा भावना व्यक्त करत जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. नवरात्रोत्सवाचे औचित्य आणि ५ सप्टेंबरच्या शिक्षक दिनाची प्रेरणा लक्षात घेऊन जनजागृती सेवा संस्थेतर्फे कर्णिक रोड, कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिक्षण मंडळ संचालित पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिरातील मुख्याध्यापिका, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या या उपक्रमातून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या कार्यक्रमात विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे प्रतीकात्मक महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी केलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना सरस्वती मातेची फोटो फ्रेम आणि शैक्षणिक सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, इंडियन कॉर्पोराइड प्रोटेक्शन अँटिव्हायरसी सेल, मुंबईचे मुख्य तपासी अधिकारी रामजीत गुप्ता, स्वराज्य रणरागिणी संस्था व वृक्षदीप वात्सल्य संस्था, टिटवाळाच्या सदस्या सुनीता चव्हाण, शब्द सुमने साहित्य मंच, कल्याणच्या अध्यक्षा तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्हाध्यक्ष अनिता कळसकर, प्रखर जागरण वृत्तपत्राच्या सहसंपादिका व समाजसेविका आशा पडवळ आणि बहिणाबाई ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाचे माजी सचिव सुनील इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षकांच्या कार्याचा गौरव; शाळेच्या प्रगतीचा आढावा
छत्रपती शिक्षण मंडळ संचालित पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दीपाली सुनील साबळे आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका तसेच जनजागृती सेवा संस्थेच्या माजी चिटणीस भारती विजय वेदपाठक यांनी शाळेची शैक्षणिक वाटचाल, विविध उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती उपस्थितांना दिली. शिक्षण क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानासोबतच शिस्त, आत्मविश्वास आणि सामाजिक मूल्यांची रुजवण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी दोन्ही विभागांच्या मुख्याध्यापिका आणि सहशिक्षिकांनी जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल शाळेच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले.
सहा वर्षांतील सामाजिक उपक्रमांचा आढावा
जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी संस्थेच्या गेल्या सहा वर्षांतील सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचा आढावा घेतला. समाजातील विविध घटकांना जोडून विधायक कार्य करण्याचा संस्थेचा प्रयत्न असून, शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव करणे ही समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक महत्त्वाची पद्धत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे रामजीत गुप्ता, सुनीता चव्हाण, अनिता कळसकर, आशा पडवळ आणि सुनील इंगळे यांनीही शिक्षकांच्या कार्याचे महत्त्व, शिक्षणातून होणारी सामाजिक जडणघडण आणि समाजहिताच्या उपक्रमांची गरज याविषयी आपले विचार मांडले. शिक्षकांनी घडविलेला विद्यार्थीच उद्याचा जबाबदार नागरिक बनतो, हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.
मुख्याध्यापिका, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान
या कार्यक्रमात पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दीपाली सुनील साबळे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भारती विजय वेदपाठक, सहशिक्षिका अंजुषा अजित कदम, सुजाता अंकुश दुरगुडे, मनीषा महेश गुरव, कविता सुनील सोनवणे, अंजली दयाल भोये, माधुरी गौरव पवार आणि सारिका बागुल यांचा गौरव करण्यात आला. तसेच नितीन चंदर काळे, वसंत काशीराम कुवरा, गणेश कृष्णा सुतार, विठ्ठल लक्ष्मण शेडगे, शाळेच्या लिपिक सुषमा शिरीष जाधव आणि शिक्षकेतर कर्मचारी नलिनी निशिकांत घरदाळे, प्रिया उत्तरेश्वरनाथ दिवार व सुमन नारायण पवार यांचाही सरस्वती मातेची फोटो फ्रेम आणि शैक्षणिक सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कविता सोनवणे यांनी मानले आभार
कार्यक्रमाच्या शेवटी सहशिक्षिका कविता सुनील सोनवणे यांनी जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. सरस्वती मातेचे दर्शन, प्रसाद आणि अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणारा आणि समाजात शिक्षण व संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

Post a Comment
0 Comments