Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

जिमलगट्टा पोलिसांनी केली मोठी कारवाई;



 चारचाकी वाहनासह साडेनऊ लाखांचा देशी दारूसाठा जप्त.

बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाने वाहन सोडून जंगलात ठोकली धूम.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

जिमलगट्टा : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत जिमलगट्टा पोलिसांनी चारचाकी वाहनासह सुमारे ९ लाख ५० हजार रुपयांचा देशी दारूसाठा जप्त केला. या कारवाईमुळे अवैध दारू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १५ ऑक्टोबर २०२६ रोजी आलापल्ली ते सिरोंचा मार्गावर जिमलगट्टा T पॉइंट यांच्या हद्दीत पोलिसांनी ही कारवाई केली. क्रेटा कंपनीच्या एम.एच. ४० बी.ई. २२९९ क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून देशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिस पथकाने संशयित वाहनाचा पाठलाग करून ते थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस पथक जवळ येत असल्याचे लक्षात येताच चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून जंगलाच्या दिशेने पळ काढला. त्यामुळे वाहनचालक पोलिसांच्या हाती लागला नाही.

पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये देशी दारूचे बॉक्स आढळून आले. त्यात ३५ बॉक्समध्ये प्रत्येकी १०० नगांप्रमाणे एकूण ३,५०० नग देशी दारूच्या निपा (बाटल्या) असल्याचे आढळले. या दारूची अंदाजे किंमत ३ लाख ५० हजार रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या जुन्या चारचाकी वाहनाची अंदाजे किंमत ६ लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर दारूचा साठा विनापरवाना विक्री व पुरवठा करण्याच्या उद्देशाने वाहतूक केला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. याप्रकरणी जिमलगट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार वाहनचालकाचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक हर्षवर्धन बी.जे. प्राणहिता, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मडावी, जिमलगट्टा तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील सिरोंचा अतिरिक्त कार्यभार जिमलगट्टा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जिमलगट्टा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विशाल गडकर यांच्या सोबत परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक रोहित सावंत व पोलिस पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक रोहित सावंत करत आहेत.

अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात पोलिसांची मोहीम सुरूच राहणार असल्याचे यावेळी पोलिसांनी मत व्यक्त केले..

Post a Comment

0 Comments