वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता रॅली व पथनाट्यातून विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग
प्रमोद एन.चिंतलवार
तालुका प्रतिनिधी गडचिरोली
मो. नं. 9405133420
धानोरा : कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, धानोरा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यार्थिनींसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थिनींनी ‘विकसित भारत २०४७’, ‘माझ्या स्वप्नातील भारत’ तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवन व विचार या विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून स्वच्छता, देशभक्ती, सामाजिक जबाबदारी, शिक्षणाचे महत्त्व आणि विकसित भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका याबाबत विचार मांडले.
यावेळी विद्यार्थिनींच्या सहभागातून स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान स्वच्छतेचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच विद्यार्थिनींनी स्वच्छतेचा संदेश देणारे प्रभावी पथनाट्य सादर केले. पथनाट्यातून परिसर स्वच्छ ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे आणि स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारणे, असा संदेश देण्यात आला.
महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देत विद्यार्थिनींनी राबविलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. विद्यार्थिनींच्या सहभागातून सामाजिक जाणीव, देशप्रेम आणि स्वच्छतेची जबाबदारी यांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.
या कार्यक्रमास कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा टी. शिंपी यांच्यासह विद्यालयातील शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments