वेडछी येथील गांधी विद्यापीठात २१ व २२ नोव्हेंबरला संमेलन; आदिवासी साहित्य, संस्कृती आणि नवोदित साहित्यिकांना मिळणार व्यासपीठ
अरविंद बेंडगा
पालघर जिल्हा प्रतिनिधी
7798185755
कासा, प्रतिनिधी : अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलनाच्या पूर्वनियोजनाची बैठक रविवार, ११ ऑक्टोबर रोजी डहाणू तालुक्यातील कासा येथील जननायक बिरसा मुंडा सभागृहात उत्साहात पार पडली. गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील वालोड तालुक्यात असलेल्या गांधी विद्यापीठ, वेडछी येथे २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी हे संमेलन आयोजित करण्यात येणार असून, त्याच्या नियोजनाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला गुजरात येथील जितेंद्रभाई वसावा व त्यांचे सहकारी, मुंबई येथील शंकर बळी, वसई येथील डॉ. सखाराम डाखोरे, कासा येथील चंद्रकांत घाटाळ, विलास बेलकर, करण बसवत, अरविंद बेंडगा, जव्हार येथील रवी बुधर, किशोर डोके, सुधीर भोईर यांच्यासह परिसरातील विविध साहित्यिक उपस्थित होते.
देशभरातील आदिवासी साहित्यिक, कवी, लेखक आणि विचारवंतांना एकत्र आणून आदिवासी साहित्य, संस्कृती, परंपरा आणि बोली भाषांच्या संवर्धनाला चालना देणे, हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून आदिवासी समाजाच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशाला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या साहित्यिकांनी गुगल फॉर्म भरून आपली वैयक्तिक व साहित्यिक माहिती आयोजकांकडे पाठवावी, असे बैठकीत सांगण्यात आले. प्राप्त माहितीच्या आधारे संमेलनाची कार्यक्रमपत्रिका तयार करण्यात येणार आहे. तसेच विविध पुस्तकांचे प्रदर्शन व विक्रीसाठी स्वतंत्र स्टॉल उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. साहित्यिकांच्या मुलाखती घेण्यासाठी यूट्यूब माध्यमांशी संबंधित व्यक्तींनाही स्वतंत्र स्टॉलची व्यवस्था करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
आदिवासी समाजाच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणारी भोजनव्यवस्था, सहभागी साहित्यिकांसाठी निवासाची सोय आणि साहित्यिकांना त्यांच्या साहित्यप्रकारानुसार विचार मांडण्यासाठी स्वतंत्र विचारमंच उपलब्ध करून देण्याबाबतही विचारविनिमय झाला. याशिवाय विविध साहित्यकृतींच्या प्रकाशनातून साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन देण्यावर चर्चा करण्यात आली.
नवोदित साहित्यिकांनाही संधी
या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रस्थापित साहित्यिकांसोबतच नवोदित लेखक आणि कवींनाही आपले साहित्य सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. आदिवासी समाजाचे मौखिक साहित्य, लोकपरंपरा, बोली भाषा, सांस्कृतिक वारसा आणि समकालीन साहित्य यांना व्यापक व्यासपीठ मिळाल्यास नव्या पिढीतील साहित्यिकांना प्रेरणा मिळेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व साहित्यिकांनी समन्वयाने काम करावे आणि देशभरातील अधिकाधिक साहित्यिकांनी या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

Post a Comment
0 Comments