Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

सोनसरी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी व कारवाईचे आदेश

 



अधीक्षिकेच्या निलंबनाचे मंत्री डॉ. अशोक उईके यांचे निर्देश; कुटुंबीयांना दोन लाख रुपयांचे अनुग्रह अनुदान


प्रमोद नामदेव चिंतलवार 

तालुका प्रतिनिधी गडचिरोली 

मो. 9405133420


गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेची आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे तसेच संबंधित अधीक्षिकेला तात्काळ निलंबित करून तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना अनुग्रह अनुदान म्हणून दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.


घटनेची माहिती मिळाल्यानंतर डॉ. उईके यांनी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. या प्रकरणात कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. उईके यांनी आश्रमशाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. घटनेच्या अनुषंगाने संबंधितांची जबाबदारी तपासून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.


गडचिरोली प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय आश्रमशाळांचा नियमित आढावा घेण्याच्या सूचनाही डॉ. उईके यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या. आश्रमशाळांतील मुख्याध्यापक आणि अधीक्षक-अधीक्षिकांशी नियमित संवाद व संपर्क ठेवून शाळा आणि वसतिगृहांतील परिस्थितीची माहिती घ्यावी, असे त्यांनी सांगितले.


यापुढे आश्रमशाळांमध्ये अशा प्रकारची घटना घडल्यास संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ. उईके यांनी दिला.


यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण एम. , माजी आमदार कृष्णाजी गजबे, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, चांगदेव फाये  व संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments