Type Here to Get Search Results !

आपत्ती व्यवस्थापनकरिता उपाययोजना करण्यासाठी दि.30 व दि.31 मे या दोन दिवसांसाठी पायरी मार्ग राहणार पूर्णपणे बंद

 



मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016



रायगड-अलिबाग दि.21:- किल्ले रायगडावर यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार दिनांक 6 जून व तिथीनुसार दि. 26 जून 2026 या रोजी साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याकरीता राज्यातील मोठयाप्रमाणात शिवभक्त नागरिक आणि अतिमहत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने आपत्ती व्यवस्थापनकरिता उपाययोजना करण्यासाठी किल्ले रायगडावर चढण्या-उतरण्यासाठीच्या पायी मार्गावरील वाटचाल दि.30 मे व 31 मे 2026 या दोन दिवसांसाठी पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड-अलिबाग किशन जावळे जारी केला आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 मधील तरतूदींनुसार कोणत्याही आपत्कालीनप्रसंगी प्रतिबंधात्मक कार्य, सौम्यीकरण उपाय योजना, तात्काळ प्रतिसाद, मदत व पुनर्वसन, समन्वय इ. कार्य करावयाचे आहेत. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मोठयाप्रमाणात नागरिकांची उपस्थित राहणार असल्याने गर्दी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

कार्यकारी अभियंता, मार्ग प्रकल्प विभाग, महाड (विशेष पथक रायगड किल्ला) यांनी सन 2023 च्या किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाच्या वेळी महादरवाजाच्या खालील बाजूस असलेल्या उंच कड्यावरुन पडलेल्या दगडामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे यावर्षीच्या सोहळयाच्या अगोदर या ठिकाणाहून उंच कडयावरील मोकळे दगड काढून घेणे आवश्यक आहे. या कड्यावरील मोकळे दगड/दरड प्रशिक्षित रॅपलर्सच्या मदतीने काढण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान, मुंबई यांनी सहमती दर्शविली असून दि.30 व 31 मे, 2026 रोजी मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमे दरम्यान पायी मार्गाने गड चढ-उतार करणाऱ्या व्यक्तींना हानी पोहचू नये, म्हणून या कालावधीमध्ये किल्ले रायगडावर जाणाऱ्या पायी मार्गावरील वाटचाल पूर्ण बंद करण्याची कार्यकारी अभियंता, मार्ग प्रकल्प विभाग, महाड (विशेष पथक रायगड किल्ला) यांनी विनंती केली आहे.

कार्यकारी अभियंता, मार्ग प्रकल्प विभाग, महाड व अध्यक्ष, दुर्गवीर प्रतिष्ठान, मुंबई यांनी याकामी आवश्यक ती खबरदारी घेवून मोकळे मोकळे दगड हटविण्याचे काम पुर्ण करावे. जिल्हा पोलीस अधिक्षक, रायगड यांनी चित्त दरवाजा, नाणेदरवाजा, गडावरील शिरकाई मंदिर (होळीचा माळ) येथे पायी मार्गावरील जाण्या-येण्याच्या प्रवेशव्दाराजवळ आवश्यक पोलीस बंदोबस्त लावावा. या कालावधीत रायगड रोप वे सुरु असणार आहे.

Post a Comment

0 Comments