Type Here to Get Search Results !

ज्ञानभारतम प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी समन्वयाने कार्य करा : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

 



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


​अहिल्यानगर, दि. २१ :- भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि बौद्धिक परंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या 'ज्ञानभारतम' प्रकल्पाची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.


​जिल्हाधिकारी कार्यालयात ज्ञानभारतम या प्रकल्पांतर्गत कार्यवाहीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. ​यावेळी तहसीलदार नागेश गायकवाड, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, महानगरपालिकेचे उपायुक्त मेहेर लहारे, संग्रहालयाचे डॉ. संतोष यादव, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजश्री घोडके यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.


​जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, भारत सरकारमार्फत राबविण्यात येणारा ज्ञानभारतम प्रकल्प हा देशाच्या सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. जिल्ह्यातील प्राचीन हस्तलिखितांचा शोध घेऊन त्यांचे दस्तऐवजीकरण, संवर्धन आणि डिजिटायझेशन करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. अनेक मौल्यवान हस्तलिखिते वैयक्तिक संग्राहकांकडे, मंदिरांमध्ये, मठांमध्ये आणि ग्रंथालयांमध्ये उपलब्ध आहेत. या हस्तलिखितांची योग्य नोंदणी करून त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. ज्ञानभारतम मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून माहिती संकलनाची प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिल्या.


​ज्ञानभारतम प्रकल्पामुळे भारताचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वपूर्ण हस्तलिखिताचा या मोहिमेत समावेश व्हावा यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

Post a Comment

0 Comments