माहूर प्रतिनिधी
आदित्य खंदारे
माहूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे निवासी ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यात यावे, तसेच मुख्य इमारत व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश बापुराव पाटील आष्टीकर यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
दि. ३० एप्रिल २०२६ रोजी पाठविलेल्या पत्रात खासदार आष्टीकर यांनी माहूर हे धार्मिक व पर्यटन स्थळ असल्याने येथे मोठ्या प्रमाणात भाविक व नागरिकांची वर्दळ असते. तसेच परिसरातील सुमारे ७० गावांतील नागरिक उपचारासाठी माहूर येथे येत असल्याने आरोग्य सुविधांवर ताण वाढत असल्याचे नमूद केले होते. रुग्णांची गैरसोय लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्राचे निवासी ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
या मागणीची दखल घेत केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी दि. २७ मे २०२६ रोजी उत्तर पाठवून संबंधित विभागामार्फत या प्रस्तावाची तपासणी करण्यात येत असल्याचे कळविले आहे. त्यामुळे माहूरवासीयांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात आरोग्य सुविधांमध्ये मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment
0 Comments