दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारची पादचाऱ्यास धडक
माहूर प्रतिनिधी
आदित्य खंदारे
माहूर शहरातील कपिलेश्वर धर्मशाळेचे संचालक भारत बेहेरे (वय ६०) यांचा आज सकाळी मॉर्निंग वॉकवरून परत येत असताना कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना मंगळवार दि. २६ रोजी सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास हॉटेल षडानन समोर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत बेहेरे हे दररोज कपिलेश्वर धर्मशाळा ते न्यायालय या मार्गावर मॉर्निंग वॉकसाठी जात असत. आज सकाळी मॉर्निंग वॉकवरून परत येत असताना औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्यातील पीशोर येथील भाविक धनाजी ज्ञानेश्वर देव (वय ३०, रा. पीशोर, ता. कन्नड) हे आपली क्रेटा कार (क्र. MH 09 CJ 7676) घेऊन कुटुंबासह माहूर येथे दर्शनासाठी येत होते. यावेळी हॉटेल षडानन समोर मागून आलेल्या कारने भारत बेहेरे यांना जोराची धडक दिली.
या भीषण धडकेत भारत बेहेरे हे सुमारे ३० ते ३५ फूट फरफटत गेले. त्यांच्या डोक्याला, तोंडाला व कमरेला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी जखमी भारत बेहेरे यांना त्याच कारमधून माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी कार चालक धनाजी देव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून माहूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके, पोलीस उपनिरीक्षक बाबू जाधव व पोलीस कर्मचारी पवन राऊत पुढील तपास करत आहेत.
भारत बेहेरे हे मनमिळावू स्वभावाचे व सामाजिक क्षेत्रात परिचित व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अकस्मात निधनाने माहूर शहरात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment
0 Comments