मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
परभणी, दि.28 : - गतवर्षी पाथरी उपविभागात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी मान्सून कालावधीत संभाव्य आपत्ती परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, परभणी यांच्या वतीने पाथरी उपविभागातील नदीपात्र परिसरात शोध व बचाव कार्याची रंगीत तालीम (Mock Drill) आयोजित करण्यात आली.
या रंगीत तालमीत आपत्तीच्या काळात आवश्यक असणाऱ्या तात्काळ प्रतिसाद यंत्रणेची कार्यक्षमता तपासण्यात आली. नदीपात्रात बोटीद्वारे बचावकार्य, पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर, लाइफ जॅकेटचा वापर, आपत्कालीन समन्वय, नागरिक बचाव व प्राथमिक उपचार यांचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
या उपक्रमासाठी मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण श्री. संजयसिंह चव्हाण, भा.प्र.से. यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. तसेच मा. निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी सर्व विभागांनी आपत्तीच्या काळात समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. पवन खांडेक यांनी आपत्ती काळातील पूर्वतयारी, जलद प्रतिसाद, स्थानिक प्रशासनाची भूमिका तसेच नागरिकांनी पूर परिस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, गतवर्षीच्या अतिवृष्टीच्या अनुभवातून धडा घेत यंदाच्या मान्सूनपूर्व काळात सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात येत असून शोध व बचाव साहित्य, बोटी, लाइफ जॅकेट, दोरखंड, आपत्कालीन संपर्क व्यवस्था आदी बाबी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
सदर उपक्रमांतर्गत प्रत्येक रेस्क्यू पथकामध्ये १० प्रशिक्षित रेस्क्यूवर याप्रमाणे एकूण ६ रेस्क्यू पथके स्थापन करण्यात आली आहेत. या प्रत्येक पथकाचे नेतृत्व संबंधित विभागाच्या अग्निशमन अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले असून आपत्तीच्या काळात तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी ही पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
सदर रंगीत तालमीत पाथरी, मानवत, सोनपेठ, सेलू व जिंतूर नगरपालिका विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकांनी सहभाग घेतला. प्रत्येक नगरपालिका स्तरावर प्रशिक्षित स्वयंसेवक, पोहणारे जवान, बोट चालक व आपत्कालीन प्रतिसाद पथकांना प्रत्यक्ष नदीपात्रात प्रशिक्षण देण्यात आले.
रंगीत तालमीदरम्यान विविध बचाव बोटींच्या साहाय्याने नदीपात्रात प्रत्यक्ष शोध व बचाव कार्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. आपत्तीच्या काळात नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, पूरग्रस्त भागात विनाकारण जाणे टाळावे तसेच आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले.
आगामी मान्सून काळात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास प्रशासन सज्ज असून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Post a Comment
0 Comments