Type Here to Get Search Results !

जिल्ह्यात अवैध दारू आणि ताडी अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; 11 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त, 91 गुन्हे दाखल




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


नंदुरबार, दिनांक 16 जून 2026: -पुणे येथे गावठी हातभट्टी दारूमुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, नंदुरबार जिल्ह्यात अवैध दारू आणि ताडी विक्री केंद्रांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. राज्य उत्पादन शुल्क नंदुरबारच्या अधीक्षक श्रीमती स्नेहा सराफ यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात गावठी हातभट्टी निर्मूलन मोहीम राबविण्यात आली, असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क निरिक्षक व्ही.ऐ. चौरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


दिनांक 29 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील गावठी हातभट्टी निर्मिती, विक्री केंद्रे तसेच ताडी विक्री केंद्रांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत आतापर्यंत एकूण 91 गुन्हे नोंदवण्यात आले असून 78 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


या धडक कारवाई दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी आरोपींच्या ताब्यातून 3 हजार 618 लीटर गावठी हातभट्टी दारू, 11 हजार 385 लीटर दारू बनवण्याचे रसायन, 595 लीटर ताडी आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली एकूण 5 दुचाकी वाहने जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 11 लाख 37 हजार 115 रुपये एवढी असून हा संपूर्ण मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. 


ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक व्ही. ए. चौरे, नंदुरबारचे निरीक्षक राजेश सपकाळ, दुय्यम निरीक्षक शरद कानडे (विभाग अ), अमित गायकवाड (विभाग ब), प्रणव मोरे (विभाग क) तसेच सीमा तपासणी नाका बेडकीपाडा येथील दुय्यम निरीक्षक कुणाल पाटील, खेडदिगर नाक्याचे हेमंत घरटे, विकास हरिश्चंद्रे आणि त्यांच्या जवान व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. जिल्ह्यातील अवैध मद्य व्यवसाय पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी अशीच धडक कारवाई पुढेही अविरत चालू राहणार असल्याची माहिती भरारी पथकाचे निरीक्षक यांनी दिली आहे. 


नंदुरबार जिल्हा हद्दीत कुठेही अवैध मद्यनिर्मिती, विक्री अथवा वाहतूक होत असल्यास नागरिकांनी तात्काळ 18008333333 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती किंवा तक्रार नोंदवावी, असेही आवाहन राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments