गोपाल खापर्डे
माहूर तालुका प्रतिनिधी
मो. 9763693140
माहूर :- अधिक मास (पुरुषोत्तम मास) निमित्त माहूर गडावरील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या धोंडे जेवण महाप्रसाद उपक्रमाची सांगता सोमवार, १५ जून रोजी उत्साहात करण्यात आली. यावेळी मठाधीश राष्ट्रसंत दभप साईनाथ महाराज वसमतकर यांच्या संकल्पनेतून आश्रम परिसरात संविधान मंदिराची स्थापना करण्यात आली. या संविधान मंदिराचे उद्घाटन आमदार किसनराव वानखेडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना आमदार किसनराव वानखेडे यांनी संविधान मंदिराच्या स्थापनेमुळे नागरिकांमध्ये देशभक्ती, संविधानाविषयी आदर आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ होईल, असे प्रतिपादन केले. तसेच या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गेल्या महिनाभरात विविध गावांतील दत्तभक्तांनी साहित्य व धान्य घेऊन आश्रमात येत महाप्रसादाची सेवा केली. दररोज विविध प्रकारचे पदार्थ बनवून हजारो भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. या अभिनव उपक्रमाचे लाखो भाविकांनी कौतुक केले. उपस्थित मान्यवरांनी साईनाथ महाराजांनी सुरू केलेल्या सप्तसूत्री उपक्रमाचे आणि संविधान मंदिर स्थापनेच्या संकल्पनेचे स्वागत करत हा उपक्रम समाजात राष्ट्रीय मूल्ये रुजविणारा असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमास ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबा दादा खराटे, देवगिरी प्रांत सहकार्यवाह रमेश जाधव, देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य डॉ. दिवाकर कुलकर्णी, प्रांत कार्यालय सहव्यवस्थाप्रमुख विशाल दरगड, विभाग संघचालक बबनराव जगाडे, नांदेड विभाग संघचालक संतोष तिरमनवार, विभाग सेवा प्रमुख आदित्य धाराशिवकर, कुंडलिक सावकार, जवाहरलाल जयस्वाल, सतीश कान्नाव, भाऊ पाटील हडसनीकर, सिताराम ठाकरे पाटील, पुंडलिक हुंबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महिनाभर महाप्रसाद सेवेत सहभागी झालेल्या सर्व भाविकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबनराव जगाडे यांनी केले, सूत्रसंचालन प्रल्हाद देवडे (परभणीकर) यांनी तर आभार प्रदर्शन श्रीनिवास ताटेवार यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment
0 Comments