Type Here to Get Search Results !

रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार; बल्हारशाह-काजीपेट रेल्वेमार्ग ठरतोय 'कर्दनकाळ'

 



🖋️ जनसंवाद न्यूज नेटवर्क 

 📱 8830857351


राजुरा, १० जून :

राजुरा वनपरिक्षेत्रातील नलफडी बिटात रेल्वेच्या धडकेत तीन महिन्यांच्या एका बिबट बछड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे बल्हारशाह-काजीपेट रेल्वेमार्ग वन्यप्राण्यांसाठी पुन्हा एकदा 'कर्दनकाळ' ठरत असल्याचे समोर आले असून, आतापर्यंत ११ हून अधिक वन्यजीवांना येथे जीव गमवावा लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नलफडी येथील कक्ष क्रमांक १७९ मधून गेलेल्या बल्हारशाह-काजीपेट डाउन रेल्वे लाईनवर ९ जून रोजी रात्री ८:१५ च्या सुमारास हा अपघात घडला. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. साधारण तीन महिने वय असलेल्या या बछड्याचा रेल्वेच्या जोरदार धडकेमुळे 'न्यूरोलॉजिकल शॉक' लागून मृत्यू झाल्याचे डॉ. एन. पी. तेलंगे यांनी केलेल्या शवविच्छेदनातून स्पष्ट झाले. त्यानंतर वनविभागाच्या नियमांनुसार बछड्यावर दहन संस्कार करण्यात आले.


बल्हारशाह ते काजीपेट हा रेल्वे मार्ग राजुरा तालुक्यातील घनदाट जंगलातून जातो, जिथे वाघ, बिबट आणि अस्वलांचा मोठा वावर आहे. रेल्वे रुळ ओलांडताना वारंवार हे अपघात घडत आहेत. प्रत्येक अपघातानंतर रेल्वे आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठकांचे सत्र रंगते, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने स्थानिक वन्यजीव प्रेमी आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची मागणी:

"रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वनविभागही हतबल झाला आहे. या मार्गावर वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजनांचा प्रस्ताव वनविभागाने राज्य व केंद्र शासनाकडे पाठवावा," अशी मागणी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने केली आहे. तसेच, अशा घटना आढळल्यास नागरिकांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

0 Comments