Type Here to Get Search Results !

ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


जळगाव, दि. 02 : -   ग्रामीण भागातील युवक, युवती आणि महिलांना शाश्वत रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भेट देऊन प्रशिक्षण व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत स्वावलंबनासाठी कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.


या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रात सुरू असलेल्या ब्युटी पार्लर मॅनेजमेंट तसेच कृषी उद्यमी प्रशिक्षण तुकड्यांना भेट देऊन प्रशिक्षण प्रक्रियेची पाहणी केली. प्रशिक्षणार्थींशी संवाद साधताना त्यांनी कृषी, उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील नव्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यशस्वी उद्योजक बनण्यासाठी सातत्य, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर केवळ नोकरीच्या शोधात न राहता आपल्या कौशल्याच्या बळावर उद्योग-व्यवसाय उभारून आत्मनिर्भर बनावे, असे आवाहनही त्यांनी प्रशिक्षणार्थींना केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिक सक्षमीकरण साधण्यावर त्यांनी भर दिला.


या प्रसंगी अग्रणी जिल्हा व्यवस्थापक सुनील दोहरे, आरसेटीचे संचालक सत्यनारायण लाल दास तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापक जतीन वालेचा उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments