घुग्गुस येथे भोंगळे परिवाराचा कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न.
मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
घुग्गुस : - आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक जण आपल्या जीवनात व्यस्त आहे. अशा वेळी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून परिवाराने एकत्र येणे आवश्यक असते. नवीन पिढीला आपल्या नातेसंबंधांची आणि संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन कौतुकास्पद असून अशा स्नेहमिलन सोहळ्याच्या माध्यमातून कौटुंबिक नातेसंबंध अधिक दृढ होण्यास मदत होते,असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.
घुग्गुस येथील प्रयास सभागृहात आमदार देवराव भोंगळे यांचे संकल्पनेतून भोंगळे परिवाराचा कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा काल अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात पार पडला.यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलतांना आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, नाती टिकली तरच समाज टिकेल आणि समाज टिकला तरच आपली संस्कृती अधिक समृद्ध होईल.स्नेहमिलन सोहळ्याच्या निमित्याने एकमेकांबद्दल मनात असणारी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आणि आदर वृद्धिंगत होऊन नात्याची वीण अधिक घट्ट होते, त्यामुळे असे कौटुंबिक स्नेहमिलन सोहळे आयोजित करणे आज काळाची खरी गरज असल्याचेही आमदार भोंगळे यांनी सांगितले.
या स्नेहमिलन सोहळ्याप्रसंगी प्रास्ताविकातून बोलतांना सौ.अर्चना देवराव भोंगळे म्हणाल्या की, आपल्या भोंगळे परिवार स्नेहमिलन सोहळ्याच्या निमित्याने आजचा हा दिवस आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील अत्यंत सुवर्ण आणि आनंदाचा क्षण आहे. तुमच्या सर्वांच्या उपस्थितीने आज हे प्रयास सभागृह एका मोठ्या कौटुंबिक उत्सवाने उजळून निघाले आहे. आमदार श्री. देवरावजी भोंगळे यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक प्रवासात आजवर अनेक मेळावे, सभा आणि कार्यक्रम घेतले , हजारो लोकांचे नेतृत्व केले, परंतु, आपल्या हक्काच्या माणसांना, आपल्या रक्ताच्या नात्यांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न त्यांच्या आणि माझ्यासाठी अत्यंत भावूक आणि मनाच्या जवळचा आहे. देवरावजींचे जन्मगाव असलेल्या या औद्योगिक घुग्घूस नगरीत, जिथे त्यांचे बालपण गेले आणि ज्या मातीने त्यांना घडवले, त्याच जन्मगावात आज संपूर्ण चंद्रपूर, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातील भोंगळे परिवार एकत्र आला आहे, याचे मला मनस्वी समाधान आणि अभिमान वाटते. आपल्यातील 'ऋणानुबंध' अधिक दृढ करणे हाच स्नेहमिलन सोहळ्याचा उद्देश असून एकमेकांची सुख-दुःखे जाणून घेणे, परस्परांना ओळखणे आणि संकटसमयी किंवा आनंदाच्या प्रसंगी संपूर्ण परिवार एकजुटीने पाठीशी उभा राहणे, हीच आपल्या कुटुंबाची शक्ती असल्याचेही सौ.भोंगळे यांनी सांगितले

Post a Comment
0 Comments