मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक ✍🏻
8208166961/9860020016
अमरावती, दि. १२ : - खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि कृषी निविष्ठांची गुणवत्ता राखण्यासाठी अमरावती जिल्हा कृषी विभागाने जिल्ह्यात धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री होऊ नये, तसेच शेतकऱ्यांकडून चढ्या दराने वसुली केली जाऊ नये, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष भरारी पथके नेमण्यात आली आहेत.
मोहिमेदरम्यान कृषी विभागाचे जिल्हास्तरीय गुण नियंत्रण भरारी पथक आणि पोलीस विभाग यांनी नुकतीच संयुक्तपणे मोठी कारवाई केली. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विराग देशमुख यांना पोलीस पथकाकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील मौजा निमगव्हाण (ता. चांदूर रेल्वे) आणि तळेगाव दशाशर पोलीस स्टेशन (ता. धामणगाव रेल्वे) यांच्या सीमावर्ती भागातील शेतात ही धाड टाकण्यात आली. या कारवाईत बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला अनधिकृत आणि बोगस एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
संबंधित शेतात धाड टाकली असता तेथे ९ गोण्यांमध्ये 'महाराजा', 'विराट', 'ग्लायको गार्ड' आणि 'कोहिनूर' अशा विविध नावांची बोगस एचटीबीटी कापूस बियाण्यांची एकूण ४३२ पाकिटे आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या या बियाण्यांची एकूण किंमत ७ लाख१२ हजार ८०० रुपये इतकी आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शुभमसिंग बलजितसिंह चौधरी (वय २१ वर्षे, मूळ रा. वाडी विस्तारवरदिया, जिल्हा कच्छ, गुजरात; हल्ली मुक्काम हिरापूर, ता. धामणगाव रेल्वे) याला ताब्यात घेतले आहे. पंचायत समितीचे गुण नियंत्रण निरीक्षक रवी राणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध वाडी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
ही कारवाई बियाणे कायदा १९६६, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा २००९ व नियम २०१० आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील विविध कलमांच्या उल्लंघनाखाली करण्यात आली आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, निविष्ठा व गुण नियंत्रण संचालक सुनील बोरकर, विभागीय कृषि सहसंचालक गणेश घोरपडे, मुख्य गुण नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते, तंत्र अधिकारी नितीन लोखंडे, विभागीय गुण नियंत्रण निरीक्षक संजय पाटील आणि जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी मल्ला तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Post a Comment
0 Comments