Type Here to Get Search Results !

सारथी'तर्फे गाविलगड आणि असदगड किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम; सिडबॉलद्वारे वृक्षारोपण उपक्रम

 



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


            अमरावती, दि. 11:- मराठा, कुणबी व कुणबी-मराठा समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी कार्यरत असलेल्या 'सारथी' संस्थेच्या वतीने राज्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. 'सारथी'चे व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील यांच्या संकल्पनेतून आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नुकताच हा उपक्रम पार पडला. छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करणे आणि शाहू महाराजांच्या लोककल्याणाचा विचार पुढे नेणे, हा यामागचा मुख्य उद्देश होता.


         या मोहिमेत अमरावती विभागांतर्गत चिखलदरा येथील गाविलगड आणि अकोला येथील असदगड किल्ल्यावर 'सारथी'च्या संशोधन अधिछात्रवृत्ती धारक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गाविलगड येथे उपव्यवस्थापकीय संचालक सचिन शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थी शंकर गोरे, रूपेश पडघन, सदाशिव आरसोड, योगेश भोयर, पवन मापारी आणि कर्मचारी किरण चाफाले, देवानंद सोळंके व कुलदीप सूरकर यांनी परिसर स्वच्छ केला. या स्वच्छता मोहिमेसोबतच विद्यार्थ्यांनी स्थानिक प्रजातींच्या बिया, माती, शेण व बाविस्टीन पावडरचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेले 'सिडबॉल' चिखलदरा परिसरात टाकले, जेणेकरून पावसाळ्यात उत्तम वृक्षनिर्मिती होईल.


      तसेच, अकोला येथील असदगड किल्ल्यावर अक्षय बांगर, अनिरुद्ध दळवी, अमोल धोत्रे, अजय काळे, सूरज पारस्कर आणि प्रिया शेटे या संशोधक विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवले. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वाटचालीतील गड-किल्ल्यांचे योगदान अधोरेखित करण्यात आले असून, नागरिकांनी या वास्तूंचे पावित्र्य राखावे व स्वच्छता ठेवावी, असे आवाहन 'सारथी' संस्थेने केले आहे.

Post a Comment

0 Comments