Type Here to Get Search Results !

मिशन क्रॅकडाउन : कासारपेठ येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड



हजारो रुपयांचे रसायन व साहित्य नष्ट; शेतमालकाविरुद्ध गुन्हा दाखल


गावात हातभट्टी दारू आढळल्यास पोलीस पाटील, सरपंच व ग्रामसेवकांवरही कारवाईचा इशारा : पोलीस निरीक्षक देविदास चोपडे


माहूर प्रतिनिधी 

आदित्य खंदारे 


माहूर तालुक्यातील मौजे कासारपेठ येथे अवैध हातभट्टी दारू निर्मितीविरोधात पोलिसांनी कारवाई करत हजारो रुपयांचे साहित्य व रसायन नष्ट केले. ही कारवाई दि. ११ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.


मौजे कासारपेठ येथील एका शेतातील गोठ्याच्या समोरील लिंबाच्या झाडाखाली हातभट्टी दारू तयार करण्यासाठी जमवून ठेवलेले मोहफुल, रसायन, प्लास्टिक टाक्या व इतर साहित्य पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी धाड टाकून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला असून, हातभट्टी दारू तयार करण्याच्या तयारीत असलेल्या शेतमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप व पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे यांच्या आदेशानुसार माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे.


हातभट्टी दारूविरोधात पोलीस निरीक्षक चोपडे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, गुप्त माहितीच्या आधारे दारू निर्मिती सुरू होण्यापूर्वीच कारवाई केली जात आहे. यापूर्वी पापलवाडी येथेही मोठी कारवाई करण्यात आली होती.


ज्या गावात हातभट्टी दारू आढळून येईल त्या गावात पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत असून, नवीन कायद्यानुसार गावातील अवैध धंद्यांना आळा घालण्यात अपयश आल्यास पोलीस पाटील, सरपंच व ग्रामसेवकांवरही जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी दिला आहे.


कासारपेठ येथील कारवाईची फिर्याद पोलीस कर्मचारी पवन राऊत यांनी दिली. या कारवाईत पोहेका प्रकाश गेडाम, सागर डरंगे, ज्ञानोबा खंदाडे यांनी सहभाग घेतला. तर पोहेका श्रीमती पुष्पा पुसनाके यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास माहूर पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments