अरविंद बेंडगा
पालघर जिल्हा प्रतिनिधी
7798185755
तलासरी, दि. १५ जून २०२६ : आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळा सूत्रकार, ता. तलासरी, जि. पालघर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या शालेय संकुलाचे उद्घाटन आज डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी नव्याने बांधण्यात आलेली शाळा इमारत, मुलांसाठीचे जननायक बिरसा मुंडा वस्तीगृह तसेच मुलींसाठीचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वस्तीगृह यांचे लोकार्पण करण्यात आले. या नव्या संकुलामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह सुरक्षित व सुसज्ज निवासी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
कार्यक्रमास महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव मा. श्री. विकास खारगे (भा.प्र.से.), पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, सार्वजनिक बांधकाम आदिवासी विभागाचे कार्यकारी अभियंता चेतन वाणी, प्रकल्प अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विशाल खत्री, तलासरी तहसीलदार अमोल पाठक, गटविकास अधिकारी वैभव साबळे, सरपंच माधुरी गोवारी तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, निवास व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
आमदार विनोद निकोले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आदिवासी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अत्याधुनिक सुविधा असलेली शाळा व वस्तीगृहे उभारणे ही काळाची गरज आहे. या नव्या संकुलामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक चांगले वातावरण मिळेल आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.
कार्यक्रमानंतर मान्यवरांनी नव्या इमारतींची पाहणी करून उपलब्ध सुविधांची माहिती घेतली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नवीन शैक्षणिक संकुलामुळे परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस नवी दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment
0 Comments