Type Here to Get Search Results !

ज्ञानमाता आदिवासी आश्रम विद्यालयात उत्साहात प्रवेश महोत्सव संपन्न




नवीन विद्यार्थ्यांचे वह्या, पुस्तके व भेटवस्तू देऊन स्वागत; माजी विद्यार्थ्यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन


अरविंद बेंडगा

पालघर जिल्हा प्रतिनिधी

7798185755


तलासरी :- झरी येथील ज्ञानमाता सदन संस्थेअंतर्गत कार्यरत संपूर्ण डिजिटल शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम विद्यालयात शासनाच्या परिपत्रकानुसार प्रवेश महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका फा. नीलम लोपिस, शाळा संचालक फा. सॅबी कोरीया, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू तर्फे प्रयोगशाळा सहाय्यक अधिकारी श्री. सोमनाथ चंद्रशेख चव्हाण, झरी गावचे उपसरपंच श्री. अरविंद भावर, श्री. सुनिल इभाड, पालक प्रतिनिधी, तसेच माजी विद्यार्थी श्री. संदीप घोरखना, श्री. संजय धांगडा व श्री. योगेश डोंगरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळी १०.३० वाजता शाळेच्या सभागृहात इयत्ता ८ वी ते १२ वीचे सर्व विद्यार्थी, विशेषतः नव्याने प्रवेश घेतलेल्या इयत्ता ८ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांचे पालक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात झाली. दीपप्रज्वलन व प्रार्थनेने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना विद्यार्थिनी कु. अपर्णा सपकाळ व विद्यार्थी कु. निखिल जनाथे यांनी केली. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ओळख करून देण्यात आली तसेच सुट्टीच्या काळात वाढदिवस असलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

नवीन प्रवेशित इयत्ता ८ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांचे वह्या, पुस्तके, खाऊ व संस्थेकडून भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील अनुभव व यशोगाथा विद्यार्थ्यांसमोर मांडल्या.

प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी श्री. सोमनाथ चव्हाण यांनी शाळेच्या कार्याचे कौतुक करत गौरवोद्गार व्यक्त केले. संस्थेच्या संचालिका फा. नीलम लोपिस यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला या नामांकित शाळेत प्रवेश मिळाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना येथे प्रवेशाची संधी मिळालेली नाही.”

कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना ‘No Pain, No Gain’ हा यशाचा मूलमंत्र देत मेहनतीला पर्याय नसल्याचे सांगितले. महत्त्वाच्या सूचना व शुभेच्छा देऊन नव्या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षकांसोबत ढोल-ताशांच्या गजरात वर्गात प्रवेश देण्यात आला.

Post a Comment

0 Comments