मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
जळगाव, दि. 12 : – पाचोरा उपविभागीय जनसमाधान कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भडगाव येथील क्रीडा संकुल तसेच जिल्हा क्रीडा विभागांतर्गत येणाऱ्या भडगाव तालुका क्रीडा संकुलास भेट देऊन उभारण्यात येणाऱ्या क्रीडा सुविधांची माहिती घेतली. भडगाव येथील बहुउद्देशीय हॉलचे बांधकाम पूर्ण झाले असून त्या ठिकाणी कुस्ती प्रशिक्षण सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच बास्केटबॉल मैदान, स्केटिंग रिंक आणि २०० मीटर धावनमार्गाच्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.
या कामांना गती देऊन, तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी क्रिडा विभागाला दिल्या. यावेळी त्यांनी सराव करणाऱ्या बाल खेळाडूंशी संवाद साधला व त्यांना क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याचा संदेश दिला.
विकासकामांच्या अंमलबजावणीत गती आणून नागरिकांना गुणवत्तापूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर राहील, असे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी यावेळी सांगितले.
तदपुर्वी जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी पिंपळगाव हरेश्वर येथील श्रीहरी हरेश्वर मंदिर परिसरास भेट देऊन माहिती घेतली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी श्रीहरी हरेश्वर मंदिरात दर्शन घेऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. मंदिर व्यवस्थापनाशी चर्चा करताना मंदिराच्या जागेसंदर्भातील मागणी शासन स्तरावर मांडून आवश्यक प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. मंदिर परिसराचा तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत व्यापक विकास करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या संवादादरम्यान जिल्हाधिकारी म्हणाले की, गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने प्रशासनाकडून जे शक्य असेल ते करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले जातील. यावेळी गावकऱ्यांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले. यावेळी उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा भुषण अहिरे, पाचोरा तहसिलदार विजय बनसोडे, भडगावच्या तहसिलदार शितल सोलाट मंदिर देवस्थान ट्रस्टचे संचालक मंडळ आदी उपस्थीत होते.

Post a Comment
0 Comments