नात्यातीलच अल्पवयीन मुलाकडून झाला अत्याचार ! पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल !
✍️ भवन लिल्हारे प्रतिनिधी📱 मो.नं.9373472847 / 8888519894
नाशिक : ( दिनांक १० जुलै २०२६ ) नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या मोहनदरी इथल्या एका शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने एका बाळाला जन्म दिला. या संवेदनशील प्रकारामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, आदिवासी विकास विभागाची यंत्रणा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
*नात्यातीलच अल्पवयीन मुलाकडून अत्याचार; 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल*
या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलत तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनीवर तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केले होते, ज्यातून ती गरोदर राहिली.
याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिसांनी सुरुवातीला कमालीची गुप्तता बाळगली होती. संशयित आरोपी हा देखील अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेऊन बाल न्याय व्यवस्थेनुसार बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
*सुट्ट्यांच्या काळात घडला प्रकार, प्रशासनाचा खुलासा*
या संपूर्ण प्रकरणावर नाशिकचे आदिवासी विकास अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी दुजोरा दिला आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार आश्रमशाळेच्या आवारात किंवा परिसरात घडलेला नाही. पीडित विद्यार्थिनी जेव्हा सुट्ट्यांच्या काळात आपल्या गावी गेली होती, त्याच वेळी हा प्रकार घडल्याचे तपासात समोर आले. तरीही या प्रकरणात आश्रमशाळा प्रशासनाकडून कुठे हलगर्जीपणा झाला आहे का, याची तपासणी करण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता यासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. निवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची नियमितपणे आरोग्य तपासणी केली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. असे असतानाही या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
एखादी मुलगी इतके महिने गरोदर राहून तिची प्रसूती होईपर्यंत ही बाब आश्रमशाळेतील शिक्षक, वॉर्डन किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास कशी आली नाही? विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आरोग्याकडे आणि त्यांच्यात होणाऱ्या शारीरिक बदलांकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष नव्हते का? असा सवाल आता विचारला जात आहे.

Post a Comment
0 Comments