Type Here to Get Search Results !

आशेरी गड परिसरात ३ हजारांहून अधिक सीड बॉल्सद्वारे वृक्षारोपण मोहीम




अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी 

7798185755


डहाणू, दि. ५ जुलै : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पालघर जिल्ह्यातील आशेरी गडाच्या पायथ्याशी रविवारी (५ जुलै) मोठ्या उत्साहात सीड बॉल्सद्वारे वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. गड परिसरातील जिथे जिथे मोकळी जागा होती, त्या ठिकाणी विविध प्रकारच्या झाडांच्या बियांचे सीड बॉल्स टाकण्यात आले.


हे सीड बॉल्स गंजाड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, दौडणपाडा (केंद्र गंजाड, ता. डहाणू, जि. पालघर) येथील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले होते. विविध झाडांच्या बिया मातीच्या गोळ्यांमध्ये सुरक्षित करून तयार करण्यात आलेल्या या सीड बॉल्सच्या माध्यमातून नैसर्गिक पद्धतीने वृक्षसंवर्धनाचा उपक्रम राबविण्यात आला.


या उपक्रमामागे ६२ वर्षीय शिक्षक सतीश मेहेर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. गेल्या तीन वर्षांपासून ते सातत्याने ही पर्यावरणपूरक मोहीम राबवत आहेत. पहिल्या वर्षी १ हजार, दुसऱ्या वर्षी २ हजार, तर यावर्षी ३ हजारांहून अधिक सीड बॉल्स आशेरी गड परिसरात टाकण्यात आले. येणाऱ्या काळातही ही मोहीम सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.


या मोहिमेत सतीश मेहेर, चंद्रकांत वरठा, नितेश उंबरकर, समीर वरठा, प्रथमेश वरठा, सुजय पाचलकर, कृतिका पाचलकर, मानसी पाचलकर, डॉ. संजय सालकर तसेच श्री. सालकर यांनी सक्रिय सहभाग घेतला.


विशेष म्हणजे, या उपक्रमात लहान मुलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. प्रत्येकाच्या हातात सीड बॉल्सची पिशवी होती आणि आनंदाने ते गड परिसरात सीड बॉल्स टाकत होते. "प्रत्येकाने आपल्या नावाचे एक नवीन झाड निर्माण व्हावे," या भावनेतून सर्वांनी पर्यावरण संवर्धनासाठी छोटासा पण महत्त्वपूर्ण प्रयत्न केला.


या उपक्रमामुळे आशेरी गड परिसरातील हरित क्षेत्र वाढण्यास मदत होणार असून, पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.

Post a Comment

0 Comments