त्रिशा राऊत नागपूर जिल्हा क्राईम रिपोर्टर मो 9096817953
नागपूर.पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून नागपूर जिल्ह्यातील तारसा परिसरात विषारी साप चावल्याने ६२ वर्षीय बेबीबाई लोहगरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत रसेल्स वायपर या अतिविषारी सापाच्या दंशाच्या सहा घटना समोर आल्याने ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजता बेबीबाई लोहगरे या घराजवळील सरपणासाठी लाकडे गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी लाकडांच्या ढिगाऱ्यात लपून बसलेल्या विषारी सापाने त्यांना दोनदा दंश केला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने तारसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. दुपारी सुमारे ३ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
वाइल्डलाइफ वेलफेअर सोसायटी, नागपूरच्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांत रसेल्स वायपरच्या दंशाच्या सहा घटना नोंदविण्यात आल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात सापांबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संस्थेच्या 'मिशन झिरो स्नेक बाईट डेथ' अभियानाअंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.संस्थेचे सदस्य नीतीश भांडक्कर यांनी सांगितले की, पावसाळ्यात साप सुरक्षित आणि कोरड्या जागेच्या शोधात घरांच्या परिसरात, शेतात तसेच लाकडांच्या ढिगाऱ्यात आश्रय घेतात. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही वस्तू उचलण्यापूर्वी काळजी घ्यावी आणि सर्पदंश झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत.

Post a Comment
0 Comments