✍️ दिलीप करकरे ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
(रायगड) - 7208708456
माणगाव : माणगाव तालुक्यातील देवळी गावातील होतकरू खेळाडू कु. मोहित नरेश भोसले याने मुंबई येथे आयोजित थाई बॉक्सिंग झोनल चॅम्पियनशिप – २०२६ स्पर्धेत आपल्या गटात दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे त्याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरून देवळी गावासह माणगाव तालुका आणि रायगड जिल्ह्याचा अभिमान वाढविला आहे.
थाई बॉक्सिंग मुंबई सबर्बन असोसिएशन यांच्या वतीने दि. १२ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत मुंबईसह राज्यातील विविध भागांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या लढतींमध्ये मोहितने उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, वेग, चपळाई आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपद पटकावले.
मोहितच्या या यशामुळे देवळी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या या यशामागे असलेले कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांचा भक्कम पाठिंबा यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भविष्यात राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही मोहित अशीच चमकदार कामगिरी करून रायगड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी आणि सर्व स्तरांतून व्यक्त केला जात आहे. युवा खेळाडूंनी जिद्द, शिस्त आणि मेहनतीच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण मोहित भोसलेने आपल्या यशातून घालून दिले आहे.

Post a Comment
0 Comments