Type Here to Get Search Results !

ऐन लावणीच्या हंगामात पावसाने फिरवली पाठ; आधी पुराचा तडाखा, आता दुष्काळाची चाहूल रायगडचा बळीराजा दुहेरी संकटात




जूनअखेरीस मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; जुलैच्या मध्यावर पावसाने घेतलेली विश्रांती शेतीसाठी ठरतेय धोक्याची घंटा.


✍️ दिलीप करकरे ✍️

माणगांव तालुका प्रतिनिधी 

( रायगड ) 7208708456


   माणगांव : रायगड जिल्ह्यात यंदाचा पावसाळा टोकाच्या विरोधाभासाचा ठरत आहे. पावसाच्या सुरुवातीलाच मुसळधार सरींनी नद्या-नाले दुथडी भरून वाहिले. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली, रस्ते खचले, शेतीचे नुकसान झाले आणि जनजीवन विस्कळीत झाले. परंतु, त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने आता शेतकऱ्यांसमोर वेगळेच संकट उभे ठाकले आहे.

      सध्या खरीप हंगामातील लावणीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी रोपे तयार करून ठेवली आहेत, काहींनी लावणीला सुरुवात केली आहे, तर अनेकजण पावसाच्या प्रतीक्षेत दिवस मोजत आहेत. मात्र आभाळ भरून येते, ढग दाटून येतात; पण पाऊस मात्र बरसत नाही. त्यामुळे शेतातील चिखल कोरडा पडू लागला असून, लावणीचे नियोजन विस्कळीत होत आहे.

     यंदाच्या हंगामाने शेतकऱ्यांसमोर एक विचित्र प्रश्न उभा केला आहे. सुरुवातीला “अतिवृष्टी” आणि आता “पावसाचा खंड”. एका बाजूला पुरामुळे आधीच नुकसान झाले, तर दुसऱ्या बाजूला आता पाऊस न झाल्यास भात लागवडीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

    रायगड हा भात उत्पादनासाठी ओळखला जाणारा जिल्हा आहे. येथील बहुतांश शेतकरी शेतीसाठी नैसर्गिक पावसावरच अवलंबून आहेत. सिंचनाच्या मर्यादित सुविधा असल्याने पावसाचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरतो. लावणी वेळेत झाली नाही, तर उत्पादनावर थेट परिणाम होतो आणि त्याचा फटका वर्षभराच्या उत्पन्नाला बसतो.

     हवामानातील सातत्याने बदलणारे स्वरूप हीदेखील चिंतेची बाब बनली आहे. कधी अतिवृष्टी, कधी दीर्घ खंड, तर कधी अवेळी पाऊस या चक्रामुळे शेतीचे नियोजन अधिकच कठीण होत आहे. शेतीचा खर्च वाढत असताना उत्पादनाची अनिश्चितता वाढल्याने शेतकरी आर्थिक आणि मानसिक दबावाखाली आहे.

       सध्या रायगडातील ग्रामीण भागात एकच चर्चा ऐकू येते“पाऊस कधी येणार?” शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. पावसाच्या प्रत्येक सरीकडे आशेने पाहणारा बळीराजा आता निसर्गाच्या कृपेची वाट पाहत आहे.

       आज परिस्थिती अशी आहे की, काही दिवसांपूर्वी ज्याच पावसाने पूर आणून संकट निर्माण केले, त्याच पावसाच्या अनुपस्थितीने आता शेतीसमोर नवीन संकट उभे केले आहे. निसर्गाच्या या लहरीपणात सर्वाधिक भरडला जात आहे तो म्हणजे अन्नदाता शेतकरी.

Post a Comment

0 Comments