नागपुरात ९८.७१ लाखांचा साठा प्रतिबंधित !
FDA असिलॉकच्या नावातच आहे घोळ !
✍️ भवन लिल्हारे भंडारा,गोंदिया जिल्हा प्रतिनिधी 📱मो.नं.9373472847 / 8888519894
भंडारा : (दिनांक १२ जुलै २०२६) राज्यात औषधांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कॅडिला फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या ‘अॅसिलॉक 150+’ आणि ‘अॅसिलॉक 300+’ या औषधांच्या सुमारे २ कोटी ४५ लाख ३७ हजार ४९० किमतीच्या साठ्यावर मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. औषधाच्या नावात केवळ 'प्लस' चिन्हाची भर घालून मूळ औषधातील सक्रिय घटक पूर्णपणे बदलण्यात आल्याने डॉक्टर, औषध विक्रेते आणि रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाच्या माहितीनुसार, अमरावती येथे नियमित तपासणीदरम्यान ही बाब उघडकीस आली. कंपनीला पूवीर्पासून अॅसिलॉक 150’ आणि ‘अॅसिलॉक 300’ या औषधांच्या उत्पादन व विक्रीची मंजुरी असून त्यामध्ये ‘रॅनिटिडीन’ हा सक्रिय औषधी घटक वापरला जात होता. मात्र, नव्याने बाजारात आणलेल्या ‘अॅसिलॉक 150+’ आणि ‘अॅसिलॉक 300+’ या औषधांमध्ये ‘फॅमोटिडीन’ हा पूर्णपणे वेगळा सक्रिय घटक वापरण्यात आला. तरीही औषधाचे ब्रँड नाव आणि लेबलचे डिझाइन जवळपास पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आले.
*मूळ घटक बदलल्यास त्याच नावाचा वापर करू नये*
तपासात जुनी ‘रॅनिटिडीन’ असलेली औषधे आणि नवीन ‘फॅमोटिडीन’ असलेली ‘प्लस’ आवृत्ती ही दोन्ही एकाच वेळी बाजारात उपलब्ध असल्याचे आढळले. त्यामुळे औषध लिहिताना, वितरित करताना किंवा वापरताना चुकीचे औषध दिले जाण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
औषधाचा मूळ घटक बदलल्यास त्याच ब्रँड नावाचा वापर करून नवीन औषध बाजारात आणू नये, असे स्पष्ट दिशानिर्देश असतानाही त्याचे पालन झाले नसल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. ‘अॅसिलॉक’ हे औषधी पोटातील आम्ल कमी करण्यासाठी वापरली जाते.
*एफडीएची राज्यभरात कारवाई*
या प्रकरणानंतर कंपनीच्या राज्यातील प्रमुख वितरण केंद्रांवर ९ व १० जुलै रोजी धाड टाकण्यात आली. पुणे येथे ८९.४५ लाख, नागपूर येथे ९८.७१ लाख आणि भिवंडी (ठाणे) येथे ५७.२० लाख किमतीचा औषधसाठा विक्रीसाठी प्रतिबंधित करण्यात आला. एकूण प्रतिबंधित साठ्याची किंमत २.४५ कोटींहून अधिक आहे.
*औषधांचा साठा परत मागविला*
‘एफडीए’ने संबंधित कंपनीला औषधांचा बाजारातील उपलब्ध साठा तातडीने परत मागविण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, निष्कर्षानुसार औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
*नियमांचे पालन करण्याचे आवाहन*
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, औषधाच्या नावामुळे रुग्ण, डॉक्टर किंवा औषध विक्रेत्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन चुकीचे औषध दिले जाण्याची शक्यता ही सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत गंभीर बाब आहे. औषधांचे ब्रँड नाव, लेबलिंग आणि विपणन करताना नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे.

Post a Comment
0 Comments