पाच मराठी चित्रपटांचे वर्ल्ड प्रीमिअर,११ पुरस्कारप्राप्त लघुपटांचे स्कीनिंग !
✍️ भवन लिल्हारे भंडारा, गोंदिया जिल्हा प्रतिनिधी मो.नं.9373472847 /8888519894
भंडारा : ( दिनांक २३ जुलै २०२६) मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर अधिक व्यापक ओळख मिळवून देणारा तिसरा नाफा (NAFA) फिल्म फेस्टिव्हल येत्या ७ ते ९ ऑगस्ट २०२६ दरम्यान अमेरिकेतील सॅन होजे येथील ऐतिहासिक कॅलिफोर्निया थिएटरमध्ये रंगणार आहे. नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (NAFA) आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवात यंदा पाच मराठी चित्रपटांचे वर्ल्ड प्रीमिअर आणि ११ पुरस्कारप्राप्त लघुपटांचे विशेष प्रदर्शन होणार आहे.
यावर्षी 'तु मी आणि अमायरा', 'न आवडती गोष्ट', 'द्विधा', 'पारो' आणि 'फ्रेम' या मराठी चित्रपटांचे जागतिक प्रथम प्रदर्शन होणार आहे. प्रेम, कुटुंब, सामाजिक वास्तव, स्त्री-अस्तित्व, नातेसंबंध आणि मानवी भावविश्व अशा विविध विषयांवर आधारित हे चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील आशयवैविध्य आणि सर्जनशीलतेचे दर्शन घडवणार आहेत.
याशिवाय 'ब्रह्मकमळ', 'बटरस्कॉच', 'एक सुवर्ण प्रवास', 'हायफन', 'अनडॉक्युमेंटेड', 'पान्हा', 'एच-१ बी ऑर नॉट टू बी', 'बबनराव इन लव्ह विथ एला', 'केकी' यांसह एकूण ११ पुरस्कारप्राप्त लघुपटांचे स्क्रीनिंग होणार आहे. विशेष म्हणजे, 'अनडॉक्युमेंट डॉट पीडीएफ (Undocumented.pdf)' या नाफा निर्मित लघुपटाचा देखील याच महोत्सवात वर्ल्ड प्रीमिअर होणार असून, अमेरिकेतील स्थलांतर (इमिग्रेशन) या संवेदनशील सामाजिक विषयावर आधारित हा चित्रपट विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाचे सहकार्य हे मराठी चित्रपटसृष्टीच्या जागतिक प्रवासाला नवी दिशा देणारे आहे. यंदा भारत, अमेरिका आणि इतर देशांतून विक्रमी संख्येने चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्यामुळे अंतिम निवड प्रक्रिया अत्यंत स्पर्धात्मक ठरली.
चित्रपटांचे मूल्यमापन एकूण परिणामकारकता, दिग्दर्शन, पटकथा, संकलन, अभिनय आणि छायांकन या सहा प्रमुख निकषांवर करण्यात आले. या प्रक्रियेत स्वप्ना वाघमारे-जोशी, आदित्य पटवर्धन, अनिकेत ढवळे, नितीन अडसूळ, डॉ. गौरी घोलप, भालचंद्र कुलकर्णी आणि दिलीप राणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
यावर्षी भारतातील आणि अमेरिकेतील सर्वोत्तम लघुपट, सर्वोत्तम भारतीय चित्रपट, सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपट तसेच व्हर्टिकल स्वरूपातील मायक्रोड्रामा अशा विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र शासनाचा भारताबाहेरील अधिकृत चित्रपट महोत्सव म्हणून मान्यता मिळालेला नाफा फिल्म फेस्टिव्हल हा केवळ चित्रपट प्रदर्शनाचा कार्यक्रम नसून, मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा सांस्कृतिक सेतू ठरत आहे. नवोदित आणि प्रस्थापित चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि जगभरातील मराठी चित्रपटप्रेमींना एकत्र आणत मराठी सिनेमाच्या जागतिक विस्ताराला नवी गती देण्याचे काम हा महोत्सव सातत्याने करत आहे.
.jpg)
Post a Comment
0 Comments